फिरायला आले कोल्हापूरहून, पण रेवदंडा बाजारपेठेत केली हातसफाई! पती-मुलांसह पर्यटनाचा बेत; बहिरी गल्लीतील लॉजवर मुक्काम, दोन दिवसांत दुकानांना फटका; एका महिलेच्या पतीचा रेवदंडा महावितरणशीही जुना संबंध
समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरहून कुटुंबासह रेवदंड्यात आलेल्या दोन महिलांचा बाजारपेठेतील चोरीचा प्रकार आता चर्चेचा विषय ठरला आहे. पती आणि मुलांसह आलेल्या या कुटुंबाने बहिरी गल्ली परिसरातील एका लॉजमध्ये मुक्काम केला होता. मात्र, पर्यटनासाठी आलेल्या या महिलांनी बाजारपेठेत फिरताना दुकानांमधून हातचलाखीने वस्तू लंपास केल्याचे उघडकीस आले.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.१९ नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
या प्रकरणाला आणखी एक वेगळा संदर्भ मिळाला आहे. संबंधित महिलांपैकी एका महिलेचे पती काही वर्षांपूर्वी रेवदंडा येथील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयात लाइनमन म्हणून कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूरहून आलेल्या या पर्यटक कुटुंबाचा रेवदंड्याशी पूर्वीपासूनच परिचय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवसांत या महिलांनी बाजारपेठेतील वेगवेगळ्या दुकानांमध्ये चोरी केली. लक्ष्मी नोव्हेल्टीमधून इमिटेशन दागिने आणि चॉकलेट्स, तर लकी स्वीट मार्टमधून मिठाई आणि शेजारील लकी हॉटेलमधून फरसाण व खाद्यपदार्थ चोरी केल्याचे समोर आले. दुकानदारांच्या सतर्कतेमुळे अखेर त्यांना पकडण्यात आले आणि रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान महिलांनी आपण कोल्हापूर येथील असल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेल्या वस्तूंबाबत कबुली देत माफी मागितल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्यांचे स्वागतच; मात्र बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या कष्टाच्या मालावर हात साफ करणाऱ्यांना रोखणेही तितकेच महत्त्वाचे.रेवदंडा हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसायाला चालना मिळते. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली अशा घटना घडत असतील तर व्यापाऱ्यांची सुरक्षितता आणि पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित होते.
![]()

