चार तासांचा प्रवास अलिबाग-रेवदंडा मार्गावर वाहतुकीचा महाभयंकर खोळंबा चौल ते अलिबाग वाहनांच्या रांगा नागाव बायपासही ठप्प अलिबागला पोहोचण्यासाठी दोन तास परतीच्या प्रवासात कुरुळपर्यंत दोन तास रेवदंडायला यायला चार तास एसटी बसेस पर्यटक आणि स्थानिक वाहनचालकांचे हाल रस्त्याचे काम सुरू पण वाहतूक नियंत्रणाचा मात्र अभाव

शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ | छावा डिजिटल न्यूज मीडिया- सचिन मयेकर
रस्त्याचे काम सुरू आहे; पण वाहतुकीचे नियोजन कुठे आहे? नागरिकांनी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहायचे तरी किती दिवस? अलिबाग-रेवदंडा मार्गावरील शनिवारच्या वाहतूक कोंडीने हे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, चौलपासून अलिबागपर्यंत, नागाव गाव आणि नागाव सहाण बायपास परिसरापासून पुढे रेवदंड्याच्या दिशेने सागमळा परिसरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. पर्यटक, एसटी बसमधील प्रवासी, स्थानिक नागरिक आणि खासगी वाहनचालक अशा सर्वांनाच या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
आजच्या प्रवासातील अनुभव तर परिस्थितीची गंभीरता सांगणारा आहे. अलिबागला पोहोचण्यासाठी तब्बल दोन तास लागले. त्यानंतर अलिबागहून परतीच्या प्रवासात कुरुळपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दोन तास खर्च करावे लागले. पुढे रेवदंड्याकडे पोहचायला चार तास लागले.जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. व रेवदंद्याकडे पोहचायला प्रवासाचा मोठा कालावधी रस्त्यावर वाहनांच्या रांगेतच अडकून पडण्यात जात असल्याने नागरिकांच्या वेळेचा अक्षरशः अपव्यय होत आहे. ही एखाद्या एकट्या वाहनचालकाची समस्या नसून संपूर्ण मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर निर्माण झालेल्या ताणाचे चित्र आहे.
चौल ते अलिबाग रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा
शनिवार असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ या परिसरात असते. अलिबाग, नागाव, चौल आणि रेवदंडा या पर्यटन पट्ट्यात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. मात्र, रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर आधीच ताण निर्माण झालेला असताना वाहनांची वाढती गर्दी परिस्थिती अधिक गंभीर करत आहे.
नागाव गावातून जाणारा रस्ता आणि नागाव बायपास परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली. चौल ते अलिबागदरम्यान वाहनांचा वेग मंदावला, तर अलिबागहून रेवदंड्याकडे येणाऱ्या वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एसटी महामंडळाच्या बसेसपासून खासगी चारचाकी, पर्यटकांच्या गाड्या आणि दुचाकींपर्यंत सर्वच वाहने या कोंडीत अडकली.
रस्त्याचे काम सुरू पण वाहतूक नियंत्रणाचा मात्र अभाव
अलिबाग-रेवदंडा मार्गावर विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे योग्य पद्धतीने नियंत्रण आणि नियोजन होत नसल्याचे आजच्या वाहतूक कोंडीवरून दिसून आले.
दोन्ही दिशांनी एकाच वेळी वाहनांची वर्दळ सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. चारचाकी वाहने समोरासमोर आल्यावर मार्ग काढणे कठीण होत असून, त्याचा परिणाम मागील वाहनांच्या लांबच लांब रांगांवर होत आहे. रस्त्यावर वेळेला वाहनांची बेशिस्त तीन रंगा झाल्या. वाहतूक नियंत्रणाअभावी hi परिस्थिती सर्वांवर ओढवली.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि काम करणाऱ्या ठेकेदाराचीही आहे. कामाच्या प्रत्येक ठिकाणी पुरेसे वाहतूक नियंत्रक, दिशादर्शक फलक आणि वाहनांना टप्प्याटप्प्याने सोडण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रभावी नियोजनाअभावी वाहनचालकांना स्वतःच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. परिणामी, संपूर्ण अलिबाग-रेवदंडा मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा वाढत आहे.
पर्यटकांना रायगड दाखवायचा की वाहतूक कोंडीचा अनुभव द्यायचा
अलिबाग आणि रेवदंडा हा रायगड जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा पट्टा आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीत पर्यटक आपल्या कुटुंबासह या भागात येतात. मात्र, अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीचा अनुभव पर्यटकांसाठीही निराशाजनक ठरतो.
एसटी बसमधील प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि स्थानिक नागरिक यांची होणारी गैरसोय तर वेगळीच. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन नसेल, तर त्याचा परिणाम काही मीटरपुरता राहत नाही; तो अनेक किलोमीटरपर्यंत पसरतो. आजच्या परिस्थितीने हेच दाखवून दिले आहे.
संबंधित बांधकाम विभाग, ठेकेदार आणि वाहतूक यंत्रणेने उत्तर द्यावे… या संपूर्ण परिस्थितीत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला होता का? कामाच्या ठिकाणी दोन्ही दिशांच्या वाहनांचे योग्य नियंत्रण का होत नाही? शनिवार-रविवारच्या पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था का करण्यात आली नाही? वाहतूक नियंत्रक आणि आवश्यक दिशादर्शक फलक प्रत्येक कामाच्या ठिकाणी उपलब्ध आहेत का? नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची उत्तरे संबंधित बांधकाम विभाग आणि वाहतूक यंत्रणेने देणे आवश्यक आहे. विकासकामे हवीत; पण नागरिकांचा छळ नको.रस्त्याचे काम लवकर आणि दर्जेदार पूर्ण व्हावे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या प्रवासाचे तासन्तास नुकसान होत असेल, तर त्या कामाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होणारच. संबंधित यंत्रणेने तातडीने वाहतूक नियंत्रकांची व्यवस्था करावी, दोन्ही दिशांच्या वाहनांना नियोजनबद्ध पद्धतीने सोडावे, पर्यायी मार्गांची माहिती द्यावी आणि रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. रस्ता चांगला होण्याची प्रतीक्षा नागरिक आनंदाने करतील; पण त्या प्रतीक्षेत तासन्तास रस्त्यावर अडकून पडण्याची शिक्षा त्यांना का? आजच्या वाहतूक कोंडीने अलिबाग-रेवदंडा मार्गावरील रस्त्याच्या कामाचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का? की नागरिकांनी प्रत्येक शनिवार-रविवारी अशाच वाहतूक कोंडीला सामोरे जायचे? विकासाच्या नावाखाली वाहतुकीचा बोजवारा नको; नागरिकांना दर्जेदार रस्त्यांसोबत सुरळीत प्रवासाचाही अधिकार आहे!
छावा डिजिटल न्यूज मीडिया
![]()

