रविवार विशेष- रुग्णालयात ॲडमिट होताच खिशाला कात्री?₹११.०५चा IV सेट ₹३२५ MRPवर! वैद्यकीय साहित्याच्या किंमतींच्या तफावतीने उडवली खळबळ

रुग्णालय म्हणजे आजारी माणसासाठी आशेचं ठिकाण… डॉक्टर म्हणजे देवदूत, अशी आपली भावना. पण रुग्णालयात ॲडमिट झाल्यानंतर सुरू होणाऱ्या बिलाचा आकडा पाहून अनेकदा नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकते. बेडचे शुल्क, डॉक्टरांची फी, तपासण्या, औषधे आणि उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या असंख्य वैद्यकीय साहित्याचा खर्च… बिल वाढतच जाते.

 

पण या सगळ्यात ज्या वैद्यकीय साहित्याची प्रत्यक्ष खरेदी किंमत किती आणि त्यावरची MRP किती, हा प्रश्न सामान्य रुग्णाला माहीत असतो का?

याच प्रश्नाने आता महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे.

 ₹११.०५ चा माल… MRP थेट ₹३२५

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सर्वेक्षणातून रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या खरेदी किंमत आणि MRPमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या माहितीनुसार, एका IV इन्फ्युजन सेटची खरेदी किंमत ₹११.०५, तर त्यावर ₹३२५ MRP असल्याचे आढळले.

आकडा छोटा नाही…
तफावत तर त्याहूनही मोठी..

यामुळे वैद्यकीय साहित्याच्या किंमत व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 सिरिंजपासून कॅथेटरपर्यंत…

सर्वेक्षणात इतर वैद्यकीय साहित्याच्या किंमतीतही मोठी तफावत आढळल्याचे समोर आले आहे.

₹६.७५ची सिरिंज — MRP ₹५७.२०

₹२९.४१चा कॅथेटर — MRP ₹३१०

काही नेब्युलायझर आणि ऑक्सिजन मास्क कमी किमतीत खरेदी केले जात असताना त्यांची MRP त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. म्हणजे रुग्णालयात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू महाग आहे, असा याचा अर्थ नाही; मात्र काही वस्तूंच्या खरेदी किंमत आणि MRPमधील प्रचंड अंतराने संपूर्ण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

 पांढऱ्या बुरख्याआड नेमकं काय?

रुग्णालयाचा पांढरा कोट विश्वासाचं प्रतीक आहे. पण त्या विश्वासाच्या व्यवस्थेत किंमतींची पारदर्शकता किती आहे? हा प्रश्न आता विचारला जात आहे.

रुग्ण आजारी असतो. त्याच्याकडे वेळ नसतो. उपचार तातडीचे असतात. डॉक्टरांनी सांगितलेली वस्तू कुठे कितीला मिळते, तिची खरेदी किंमत काय आहे, MRP काय आहे—याची तुलना करण्याची संधी अनेकदा रुग्णाच्या नातेवाईकांकडे नसते.

म्हणूनच रुग्णाच्या मजबुरीचा गैरफायदा होऊ नये आणि वैद्यकीय साहित्याच्या किंमतीबाबत स्पष्टता असावी, हीच या प्रकरणातून पुढे आलेली सर्वात मोठी अपेक्षा आहे.

 FDAने घेतला मुद्दा; आता NPPAकडे नजर!

महाराष्ट्र FDAने या किंमत तफावतीचा मुद्दा नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (NPPA) आणि केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेकडे मांडला आहे.

वैद्यकीय उपकरणे आणि हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या आवश्यक कंज्यूमेबल्सच्या किंमती अधिक तर्कसंगत करण्यासाठी तसेच किंमत नियंत्रणाच्या उपाययोजनांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आता प्रश्न आहे—

FDAचा प्रस्ताव पुढे काय वळण घेतो?

NPPA या किंमत तफावतीवर काय निर्णय घेते?

आणि सर्वात महत्त्वाचंh रुग्णाच्या खिशावरचा हा भार कमी होणार तरी कधी?

₹११.०५चा IV सेट आणि ₹३२५ची MRP हा केवळ एका वस्तूचा आकडा नाही. तो रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याच्या किंमत व्यवस्थेकडे नव्याने पाहण्याची गरज दाखवणारा धक्कादायक उदाहरण आहे.

रुग्णाला उपचार हवेत…
नातेवाईकांना विश्वास हवा…
आणि सरकारकडून हवी आहे पारदर्शक किंमत व्यवस्था!

कारण आजारी माणूस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातो; बिलाच्या आकड्यांनी आणखी आजारी होण्यासाठी नाही!

— छावा डिजिटल न्यूज मीडिया

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *