अलिबागमध्ये स्थानिक वेल्डर मालकांची संघटना; स्थानिकांच्या हक्कासाठी मनसेचा ठाम पाठिंबा
छावा डिजिटल न्यूज मीडिया अलिबाग सचिन मधुकर मयेकर
स्थानिक वेल्डिंग व्यवसायिकांच्या हक्कांसाठी नव्याने स्थापन झालेल्या अलिबाग स्थानिक मालक वेल्डर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग मनसे कार्यालयात भेट देत आपल्या विविध समस्या आणि व्यवसायासमोरील अडचणी मांडल्या. यावेळी मनसेच्या वतीने स्थानिक मराठी भूमिपुत्रांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यात आली. यावेळी बोलताना सिद्धू म्हात्रे यांनी स्थानिकांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या हक्काचा मुद्दा उपस्थित करत, “आपल्या हातचा घास जर कोणी बाहेरून येऊन हिरावून घेणार असेल, तर स्थानिक मराठी भूमिपुत्रांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे,” अशी भूमिका मांडली. स्थानिकांच्या हक्कासाठी, रोजगारासाठी आणि व्यवसायाच्या संरक्षणासाठी मनसे नेहमीच ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक मराठी बांधवांना व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्याने स्थापन झालेल्या अलिबाग स्थानिक मालक वेल्डर संघटनेला सिद्धू म्हात्रे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायिकांचे प्रश्न संघटितपणे मांडले जातील आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज अधिक बुलंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “स्थानिकांचा हक्क स्थानिकांनाच!” या भूमिकेसह अलिबागमधील स्थानिक व्यवसायिकांच्या प्रश्नांना आता संघटित व्यासपीठ मिळाले आहे.
![]()

