तू माझा खरा पप्पा नाहीस… मला माझ्या पप्पांकडे जायचंय निष्पाप शब्द ठरले चिमुकल्या मोक्षसाठी अखेरचे; उरणमध्ये सावत्र पित्याने केला निर्घृण खून.

छावा डिजिटल न्यूज मीडिया उरण ✍️  विशेष प्रतिनिधी

उरणमधील फणसवाडी (मोरा) परिसरात अवघ्या ३ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुकल्या मोक्षची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. “तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय…” या चिमुकल्याच्या निष्पाप हट्टाचा राग अनावर झाल्याने सावत्र पित्याने त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर मुलगा खेळताना पलंगावरून पडून जखमी झाल्याचा बनाव करून परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मोरा सागरी पोलिसांची सतर्कता आणि शवविच्छेदन अहवालामुळे या क्रूर हत्येचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र प्रदीप भिसे (२८) याला अटक केली आहे.

चिमुकल्यावर सातत्याने मारहाणीचा आरोप

मृत मोक्ष हा त्याची आई काव्या आणि तिचा दुसरा पती जितेंद्र भिसे यांच्यासोबत फणसवाडी येथे राहत होता. मोक्ष हा जितेंद्रचा सावत्र मुलगा असल्याने त्याच्यावर किरकोळ कारणांवरून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. १४ ऑगस्ट रोजी दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच असताना हा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मोक्षने जितेंद्रला, “तू माझा खरा पप्पा नाहीस… मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय,” असा हट्ट केला. या निष्पाप शब्दांचा आरोपीला संताप आला आणि त्याने चिमुकल्या मोक्षला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. डोके भिंतीवर आपटले, काठीने मारहाण; छातीवरही ठोसा

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मोक्षचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर लाकडी काठीने त्याच्या पायांवर मारहाण केली. एवढ्यावरही न थांबता त्याला सोफ्यावर पाडून छातीवर जोरदार ठोसा मारल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मोक्षच्या बरगड्यांना गंभीर दुखापत तसेच डोक्याला गंभीर इजा झाली. या जीवघेण्या मारहाणीत चिमुकल्या मोक्षचा मृत्यू झाला.

हत्या लपवण्यासाठी अपघाताचा बनाव

मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने कथितरित्या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. मुलगा घरात खेळताना पलंगावरून खाली पडला आणि बेशुद्ध झाला, असा बनाव करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. यानंतर मोक्षला तातडीने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे ४ वाजता त्याला मृत घोषित केले. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्याऐवजी आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया न करता अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरू झाल्याने पोलिसांना संशय आला. मोरा सागरी पोलिसांची सतर्कता; शवविच्छेदनाने उघडले सत्य या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र १५ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालातील निष्कर्षांनी संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगड्यांना फ्रॅक्चर आणि जबर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हा साधा अपघाती मृत्यू नसल्याचे स्पष्ट झाले.

वैद्यकीय अहवालानंतर पोलिस तपासाला वेग

शवविच्छेदनातून मिळालेल्या निष्कर्षांनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तांत्रिक तपास आणि चौकशीनंतर आरोपी जितेंद्र भिसे याच्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर अपघाताचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असला तरी वैद्यकीय पुरावे आणि पोलिसांच्या तपासामुळे अखेर सत्य समोर आले. आरोपीला अटक; २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी या प्रकरणी आरोपी जितेंद्र प्रदीप भिसे (२८) याच्यावर हत्या तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांनी दिली. चिमुकल्या मोक्षच्या हत्येने उरण परिसर हादरला असून, एका निष्पाप बालकाच्या आयुष्याचा इतक्या क्रूर पद्धतीने अंत झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एका चिमुकल्याचा निष्पाप हट्ट… आणि त्या शब्दांचा राग सावत्र पित्याने इतका मनावर घेतला की, अवघ्या साडेतीन वर्षांच्या जीवाला त्याची किंमत मोजावी लागली. आता या प्रकरणातील प्रत्येक पुरावा न्यायालयात काय सत्य उलगडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *