प्रसूतीच्या निर्णायक क्षणी डॉक्टर गैरहजर नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर कारवाई; ड्युटीवरील अनुपस्थितीचा ठपका.

सचिन मयेकर  | २ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

चार वर्षांपूर्वी अलिबाग जिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन ऑन-ड्युटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल रविंद्र शेंडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली असून जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बेलोशी (ता. अलिबाग) येथील सुष्मिता रुपेश काटले या १४ मे २०२२ रोजी प्रसूतीसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. फिर्यादीनुसार, पहाटेपासून रुग्णालयात दाखल असूनही त्यांना वेळेवर आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. प्रसूतीच्या वेदना तीव्र होत असताना वारंवार डॉक्टरांना बोलावण्याची विनंती करण्यात आली; मात्र ऑन-ड्युटी असलेल्या डॉ. शेंडे या रुग्णालयात उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीदरम्यान बाळाचे डोके बराच काळ अडकून राहिले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही वेळेत सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. अखेर सकाळी नर्सिंग स्टाफने प्रसूती केली; मात्र नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर अलिबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद क्र. ३३/२०२२ अंतर्गत तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान सर्व वैद्यकीय कागदपत्रे सर जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडे पाठविण्यात आली. २७ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या समितीच्या अहवालात प्रसूतीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ड्युटीवरील डॉक्टर उपस्थित राहणे आवश्यक असतानाही त्या अनुपस्थित असल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

पीडित माता सुष्मिता काटले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “डॉ. प्रियल शेंडे यांच्या कथित निष्काळजीपणामुळे माझे बाळ कायमचे माझ्यापासून हिरावले गेले. माझे बाळ परत मिळणार नाही, मात्र या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, अलिबाग पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश नारायण पाटील म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील कथित निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप नवजात बालकांना जन्माआधी किंवा जन्मानंतर जीव गमवावा लागत आहे. सर्वसामान्यांच्या मुलांच्या जीवाची किंमत आहे की नाही, असा प्रश्न आता समाजासमोर उभा राहिला आहे. अशा घटनांची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारांवर कठोर कारवाई करणारी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची वेळ आली आहे.”

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांची गुणवत्ता, डॉक्टरांची उपस्थिती, जबाबदारी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणातील सत्य समोर येईलच; मात्र एका आईच्या कुशीत येण्यापूर्वीच हरपलेल्या निष्पाप जीवाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *