फोनची एक रिंग. आणि दारात औषधांसह उभा असतो ‘बाबा’ रेवदंड्याच्या माणुसकीचा चेहरा मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम

छावा Filmfare | विशेष | सचिन मयेक
प्रिय वाचकहो,
छावा Filmfare म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कलाकार, गायक, अभिनेते किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती येतात. मात्र आमचा विश्वास आहे की खरा “स्टार” तोच, जो आपल्या कामातून समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडतो. म्हणूनच आज शुक्रवार नसतानाही आम्ही बुधवार विशेष म्हणून एका अशा व्यक्तीची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याने प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता माणुसकीची सेवा जपली आहे.
हा लेख चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीवर नाही, तर रेवदंड्यातील असंख्य कुटुंबांसाठी गरजेच्या वेळी धावून जाणाऱ्या मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम यांच्या कार्यावर आहे. कारण आमच्या दृष्टीने समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणारी माणसंच खरी Filmfare Hero असतात.
चला, भेटूया औषधांच्या पुडीतून माणुसकी जपणाऱ्या या रेवदंड्याच्या “हिरो”ला…
काही माणसं व्यवसाय करतात, तर काही माणसं व्यवसायातून समाजाशी नातं जोडतात. रेवदंडा वाडीमोहल्ल्यात राहणारे मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. ‘बाबा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स’ हे त्यांच्या दुकानाचं नाव असलं, तरी अनेकांसाठी ते फक्त मेडिकलचे मालक नाहीत, तर गरजेच्या क्षणी धावून येणारा विश्वासाचा माणूस आहेत.
आजच्या काळात औषधांशिवाय उपचाराची कल्पनाच करता येत नाही. मात्र औषधांची गरज असताना प्रत्येकाला मेडिकलपर्यंत जाता येतंच असं नाही. एखादा ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेला रुग्ण, तापाने फणफणणारं मूल किंवा घरातून बाहेर पडू न शकणारं कुटुंब… अशा वेळी रेवदंड्यात एक फोन केला की काही वेळात औषधांसह दारात उभे असतात बाबा मुकादम.
आजारपणाचे अनुभव… आणि जन्माला आलेली सेवेची भावना
बाबा मुकादम यांनी मेडिकल व्यवसाय निवडला तो केवळ व्यवसाय म्हणून नाही. घरात आणि समाजात अनेक आजारपणाचे प्रसंग जवळून पाहिले. आजारामुळे होणारी धावपळ, औषधांसाठीची तगमग आणि रुग्णांची असहायता त्यांनी अनुभवली. त्यातूनच समाजाला उपयोगी पडेल असा व्यवसाय करण्याचा निर्णय घेत त्यांनी ‘बाबा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स’ सुरू केले.
पाऊस असो, ऊन असो… सेवा मात्र थांबत नाही
रेवदंड्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू कुटुंबांसाठी बाबा मुकादम म्हणजे घरपोच औषध सेवा. फोन आला की वेळ, पाऊस, ऊन किंवा वारा याचा विचार न करता ते आवश्यक औषधे घेऊन स्वतःच संबंधितांच्या घरी पोहोचतात. अनेकदा रात्री-अपरात्रीही ते रुग्णांच्या मदतीला धावून जातात. या सेवेमुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.
अपघाताने हात जखमी झाला… पण माणुसकीचा हात मागे घेतला नाही
११ मे २०२५ हा दिवस बाबा मुकादम यांच्या आयुष्यातील कठीण दिवस ठरला. बैलगाडी वर असताना थळ येथील समुद्रकिनारी त्यांचा अपघात झाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत अनेक जण काही काळ विश्रांती घेतात. मात्र बाबा मुकादम यांनी शक्य तितक्या लवकर पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात केली. स्वतः वेदना सहन करत असतानाही गरजूंना औषधे पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला.
औषधांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे दिलासा
औषधांची पुडी देणं ही एक गोष्ट आहे; पण रुग्णाला “काळजी करू नका, आम्ही आहोत” हा दिलासा देणं ही दुसरी. बाबा मुकादम यांच्याबद्दल अनेक नागरिकांच्या मनात असलेला विश्वास याच माणुसकीतून निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना अनेक जण प्रेमाने “बाबा” म्हणतात.
माझा स्वतःचा अनुभव…
पत्रकार म्हणून अनेक व्यक्तींच्या कार्यावर लिहिण्याची संधी मिळते. पण काही अनुभव स्वतःच्या आयुष्यात घडतात आणि ते मनाला स्पर्श करून जातात.
मला काही औषधांची तातडीची गरज होती. नेहमी मी स्वतः मेडिकलमध्ये जातो, पण त्या क्षणी आजारपणामुळे घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. मी फक्त बाबा मुकादम यांना फोन केला. काही मिनिटांतच ते आवश्यक औषधं घेऊन आमच्या घरी आले.
त्या क्षणी जाणवलं… मेडिकलचा व्यवसाय करणं वेगळं आणि माणुसकी जपणं वेगळं. म्हणूनच हा लेख लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली.
समाजात अशी माणसं असणं हीच खरी श्रीमंती
आजच्या धावपळीच्या जगात वेळ देणारी माणसं कमी होत चालली आहेत. अशा वेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता गरजेच्या क्षणी धावून येणारी माणसं समाजाची खरी ताकद असतात. बाबा मुकादम यांचं कार्य हे केवळ औषध विकण्यापुरतं मर्यादित नाही, तर माणुसकीचा धागा जपण्याचं काम आहे.
“छावा” तर्फे मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम यांच्या या सेवाभावी कार्याला मनःपूर्वक सलाम..अशीच त्यांची सेवा पुढेही सुरू राहो आणि अनेक गरजू कुटुंबांना त्यांचा आधार लाभत राहो, हीच सदिच्छा.
![]()

