काँट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर 

आज दि २३ जून २०२६ रोजी जांभूळपाडा–जळपाडा दरम्यान असलेल्या आईस फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे आज सकाळी १२ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरून अपघातग्रस्त झाली. अनेक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

जळपाडा ते कार्लेखिंड मार्गावरील कामात योग्य सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक व बॅरिकेड्स नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत १५ हून अधिक अपघात घडले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

या प्रकरणी संबंधित काँट्रॅक्टर व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अलिबाग यांच्या वतीने आज पोयनाड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.

नागरिकांच्या जीवापेक्षा कोणतेही काम मोठे नाही

रस्त्यांचे काम विकासासाठी असते, पण जर त्याच कामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील तर तो विकास नव्हे तर निष्काळजीपणाचा कळस आहे. जांभूळपाडा–जळपाडा मार्गावरील सततच्या अपघातांनी हेच सिद्ध केले आहे. योग्य सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक आणि बॅरिकेड्स न लावता काम सुरू ठेवणे म्हणजे वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखे आहे.

प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारून दोषींवर कारवाई करावी. अपघातानंतर केवळ पंचनामे आणि आश्वासने देऊन चालणार नाही. जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी आहे.

नागरिकांचा जीव गेला तर रस्ता पुन्हा बांधता येईल, पण गेलेला जीव परत आणता येणार नाही. त्यामुळे “प्रथम सुरक्षा, नंतर विकास” हेच धोरण प्रशासनाने स्वीकारण्याची वेळ आली आहे. 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *