नराधम बँक मॅनेजराचा रक्तरंजित कट प्रियकरासाठी आईनेच चिमुकल्या अंगदवीरला मृत्यूच्या दाढेत ढकलले? प्रेमासाठी मातृत्वाचा बळी? सहा वर्षांच्या अंगदवीरच्या हत्येने देशभर संताप
🔴 काम हो गया” मेसेजने उघड झाला काळा कट नराधम बँक मॅनेजर आणि आईच्या कथित संगनमतातून ६ वर्षीय अंगदवीरची हत्या; देशभर संताप
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्त 📅 दि. २२ जून २०२६
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज परिसरात घडलेल्या अंगदवीर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ज्या आईच्या कुशीत मुलाला सुरक्षित वाटायला हवे, त्याच आईवर स्वतःच्या सहा वर्षीय मुलाच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत कौर हिने तिचा प्रियकर आणि एका खाजगी बँकेचा मॅनेजर असलेल्या अर्पित पाराशर याच्यासोबत मिळून ही कथित साजिश रचली.
मंगळवारी अंगदवीर घराबाहेर खेळत असताना गुरप्रीतने व्हॉट्सॲप कॉलद्वारे अर्पितला घराजवळ बोलावल्याचे तपासात समोर आले आहे. अर्पित कार घेऊन घरापासून काही अंतरावर उभा होता. त्यावेळी गुरप्रीत स्वतः अंगदवीरला घेऊन बाहेर आली आणि त्याला “अंकलसोबत जा, ते तुला घड्याळ आणि चॉकलेट घेऊन देतील” असे सांगितले. आईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून निष्पाप अंगदवीर कोणताही संशय न बाळगता कारमध्ये बसला. त्यानंतर गुरप्रीत नजीबाबाद येथील माहेरी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस तपासानुसार, अर्पितने अंगदवीरची हत्या केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत गुरप्रीतला व्हॉट्सॲपवर “काम हो गया” असा संदेश पाठवला. यावर गुरप्रीतने “कोणाला काही दिसले नाही ना?” अशी विचारणा केल्याचेही तपासात उघड झाले आहे. संध्याकाळी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे समजताच गुरप्रीतने अर्पितला “पोलिस आले आहेत, फुटेज मिळाली आहे, आता आपण वाचणार नाही, फोन करू नकोस आणि माझे नाव घेऊ नकोस” असा संदेश पाठविल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर दोघांनीही आपापले व्हॉट्सॲप चॅट डिलीट केल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्येमागील कथित कारण. पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अंगदवीरची झोप अचानक उघडली होती. त्यावेळी त्याने आपल्या आईला आणि अर्पितला एकत्र पाहिले होते. ही बाब तो आपल्या वडिलांना किंवा आजीला सांगेल, अशी भीती दोघांनाही वाटत होती. गुरप्रीतला पतीपासून वेगळे होऊन अर्पितसोबत आयुष्य जगायचे होते आणि अंगदवीर हा त्या नात्यातील अडथळा ठरेल, असे दोघांना वाटत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच भीतीतून हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेच्या दिवशी अंगदवीर सायकल चालवून घरी आला आणि पुन्हा खेळण्यासाठी बाहेर गेला. बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. अखेर त्याची आजी बलविंदर कौर यांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंगदवीर एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोणत्याही भीतीशिवाय बसताना दिसला. मुलगा परिचित व्यक्तीसोबत गेल्याचा संशय पोलिसांना आला. तपासाची दिशा बदलली आणि संशयाची सुई अर्पित पाराशरकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो कोसळला आणि गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी गुरप्रीत कौरलाही अटक केली.
या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. एका निष्पाप बालकाचा जीव अशा प्रकारे घेतला गेल्याच्या आरोपामुळे अनेकांनी या घटनेला “मानवतेला काळीमा फासणारी घटना” असे संबोधले आहे.
✍️ छावा संपादकीय
मातृत्व हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही संकटाशी लढते, अशी समाजाची धारणा आहे. मात्र मेरठमधील या प्रकरणातील आरोपांनी त्या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सहा वर्षांच्या निष्पाप अंगदवीरला काय माहिती, ज्यांच्यावर तो सर्वाधिक विश्वास ठेवत होता, त्यांच्याच भोवती मृत्यूचा सापळा विणला जात असल्याचा आरोप आहे. न्यायालयात दोष सिद्ध होणे अद्याप बाकी असले तरी या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. अंगदवीरला न्याय मिळावा आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, हीच आज सर्वसामान्यांची भावना आहे.
![]()

