पोल पेटतोय… ग्रामस्थ जागतायत… महावितरण झोपलंय का? विठोबा आळीतील प्रकारानंतर रेवदंडेकरांचा संताप पाऊस सुरू होण्याआधीच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा ✍️ सचिन मयेकर | दि. २१ जून २०२६
रेवदंड्यात पाऊस अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही. मात्र विजेच्या लपंडावाने आणि वारंवार होणाऱ्या फॉल्टमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. विठोबा आळी परिसरातील वीज खांबावर मध्यरात्री झालेल्या तीव्र स्पार्किंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ खांबाने अक्षरशः पेट घेतल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून याच खांबावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. रात्री १ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत महावितरणच्या ग्रुपवर संदेशांचा अक्षरशः पाऊस पडत होता. “लाईट कधी येणार?”, “दिवसातून शंभर वेळा लाईट जाते”, “सहनशक्तीलाही मर्यादा असते”, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. अनेक घरांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना रात्रीचा त्रास सहन करावा लागल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी “छावा”ने रेवदंड्यातील वीजयोद्ध्यांच्या कार्याला सलाम केला होता. आजही त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. कारण कडक ऊन, मध्यरात्र, वादळी वारे किंवा पाऊस असो, वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतात. त्यामुळे प्रश्न कर्मचाऱ्यांचा नाही, तर व्यवस्थेचा आहे. ग्रामस्थांचा सवाल असा आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल, ट्री कटिंग, लाईन तपासणी, दुरुस्तीची कामे होत असतील तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच असे प्रकार का घडत आहेत? संबंधित खांबावर यापूर्वी स्पार्किंग झाले होते, तर कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात आली नाही? याहून गंभीर बाब म्हणजे सतत होणारी वीजेची ये-जा आणि कमी-जास्त होणारे व्होल्टेज. यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, सीसीटीव्ही, इंटरनेट राऊटर, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. हजारो रुपयांची उपकरणे धोक्यात येत असताना त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एकीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बिल थकल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्याची व्यवस्था सज्ज आहे. मात्र पूर्ण बिल भरणाऱ्या ग्राहकाला अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी तितकीच तत्परता दिसते का, असा सवाल आता रेवदंड्यातील नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे, छावा डिजिटल न्यूज पोर्टलकडे गेल्या अनेक महिन्यांपासून रेवदंडा परिसरातील वीजपुरवठ्याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. कधी कमी-जास्त होणारे व्होल्टेज, कधी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तर कधी रात्री-अपरात्री होणारे फॉल्ट यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा नागरिकांनी फोटो, व्हिडिओ आणि लेखी तक्रारी पाठवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका आळीचा किंवा एका दिवसाचा नसून रेवदंड्यातील अनेक भागांतील नागरिकांना भेडसावणारा गंभीर प्रश्न बनत चालल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
बिल न भरल्यास वीज तात्काळ बंद होते… मग वारंवार वीज जात असेल, पोल पेटत असतील आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळत असतील तर जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता केवळ विठोबा आळीचा राहिलेला नाही, तर संपूर्ण रेवदंड्यातील नागरिकांच्या मनातील प्रश्न बनला आहे.
![]()

