सुडकोली बस स्टॉपवर भरदिवसा दांडक्याचा धुमाकूळ! ज्येष्ठ नागरिकासह पत्नी जखमी; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०७ जून २०२६

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुडकोली येथे जुन्या जागेच्या कुंपणाच्या वादातून भरदिवसा मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नीला बांबूच्या दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून दोघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ म्हात्रे (वय ६०) हे ६ जून रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता सुडकोली बस स्टॉप येथे एस.टी. बसची प्रतीक्षा करत बसले होते. जागेच्या कुंपणाच्या वादाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या पाठीमागून येत हातातील बांबूच्या दांडक्याने त्यांच्या पाठीवर व डाव्या हातावर वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात दशरथ म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र दांडक्याचा फटका त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला बसून दुखापत झाली. तसेच पाठीवर आणि डाव्या डोळ्याजवळही मार लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पतीला वाचविण्यासाठी धावलेल्या दर्शना म्हात्रे यांनाही आरोपीने सोडले नाही. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या कंबरेवर व उजव्या पायाच्या पोटरीवर बांबूच्या दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२ व ३५१(२) अंतर्गत सुदर्शन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार ठाकूर करीत आहेत. दरम्यान, भरदिवसा बस स्टॉपवर घडलेल्या या प्रकारामुळे सुडकोली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *