छावा एक्सक्लुझिव्ह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ कॉलेज-कोचिंग साटेलोट्यावर मंत्रालयात खदखद
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, मुंबई –सचिन मयेकर – दि. २०/०५/२६
NEET पेपरफुटीनंतर शिक्षण व्यवस्थेतील कथित ‘कोचिंग कनेक्शन’वर कारवाईची मागणी
देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर संशयाची सावली गडद होत असतानाच आता महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसमधील कथित अनधिकृत साटेलोट्याचा मुद्दा थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
शिक्षण की पॅकेज डीलं
राज्यात काही ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश घ्या क्लास मोफत,क्लासला प्रवेश घेतल्यास कॉलेज सीट निश्चित. अशा कथित योजनांमुळे शिक्षणाचे व्यापारीकरण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची उपस्थिती, प्रवेश प्रक्रिया, फी संरचना आणि प्रत्यक्ष अध्यापन या सर्व बाबींमध्ये खासगी कोचिंग संस्थांचा वाढता हस्तक्षेप विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यासाठी धोकादायक ठरत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगू लागली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या काय?
▪️ कॉलेज-कोचिंग भागीदारीवर कठोर निर्बंध
▪️ “कॉम्बो अॅडमिशन” योजनांची चौकशी
▪️ हितसंबंध जाहीर करण्यासाठी शपथपत्र सक्तीचे करणे
▪️ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन तक्रार पोर्टल
▪️ जिल्हास्तरीय तपास समित्या
▪️ नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कारवाई
▪️ आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र ऑडिट
▪️ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये विशेष तपास मोहीम
मंत्रालयातील चर्चेनंतर काय संकेत?
सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विषय गांभीर्याने घेत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर आवश्यक प्रशासकीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही दादा भुसे यांनी खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रणासाठी कायदा आणण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता या नव्या हालचालींकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
🛑 छावा सवाल
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा करणाऱ्या कथित शिक्षण माफियांवर आता खरोखरच हातोडा पडणार?
की पुन्हा एकदा चौकशी समित्या, बैठका आणि आश्वासनांच्याच फाईली फिरत राहणार? NEET पेपरफुटीने हादरलेल्या देशात महाराष्ट्रातही शिक्षण व्यवस्थेतील कथित काळे व्यवहार उघड होणार का? याची उत्सुकता आता विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला लागली आहे.
छावा न्यूज | निर्भीड, रोखठोक आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट वार करणारा आवाज. छावा न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विषयावर मंत्रालय स्तरावर चर्चा झाल्याचे समजते. अधिकृत निर्णय अथवा शासन आदेश येणे बाकी आहे.
![]()

