जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही. – डॉ. सचिन राऊळ

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल— सचिन मयेकर – दि. १८/०५/२६

उमटे धरणाच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सभेमध्ये आक्रमक भूमिका घेत चौल मतदारसंघाचे सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी संपूर्ण वेळ हा केवळ पाणी प्रश्नावर खर्च केला. “मला सभागृहात जेवढा वेळ देण्यात आला होता, तो मी पूर्णपणे उमटे धरणाच्या प्रश्नासाठी वापरला. कारण हे धरण हजारो नागरिकांच्या जीवनाशी जोडलेलं आहे,” असे त्यांनी ‘छावा’शी बोलताना स्पष्टपणे सांगितले.

डॉ. राऊळ यांनी ‘छावा’ला माहिती देताना सांगितले की, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रशासन स्तरावर या प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तातडीने निधी उपलब्ध करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. “आपण उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद बैठक आहे. त्यामध्ये नेमका कोणता प्रस्ताव आणि काय निर्णय होतो, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील माहिती समोर येईल,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “मी जेव्हा-जेव्हा अधिकाऱ्यांना आणि संबंधितांना भेटतो, तेव्हा वातावरण सकारात्मक दिसत आहे. काम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” अशी माहिती त्यांनी ‘छावा’शी बोलताना दिली.

रात्रंदिवस उमटे धरणावर लक्ष

डॉ. राऊळ यांनी गेल्या काही दिवसांत वारंवार उमटे धरण परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आहे. “आम्ही दिवसातून किंवा दोन दिवसातून धरणावर जात आहोत. सध्या थोडाफार पाणीसाठा आहे. मात्र तेथील मशीनरी, जॅकवेल आणि फिल्टर प्लांट बंद अवस्थेत आहेत. ते तातडीने सुरू होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ‘छावा’ला माहिती देताना सांगितले.

त्याचबरोबर धरण परिसरातील गाळ, झाडाझुडपं आणि अडथळे दूर केल्यास पुढील वर्षी पाणीपुरवठा अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निधीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न

“मी केवळ जिल्हा परिषदेतच पाठपुरावा करत नाही, तर आमदार साहेबांशी संपर्कात आहे. विविध कंपन्या, उद्योग आणि सामाजिक संस्थांकडेही मदतीसाठी जात आहे. फक्त आश्वासन नको, तर प्रत्यक्ष जेसीबी, पोकलेन, ट्रक यांसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून द्या, अशी विनंती मी करत आहे,” असेही डॉ. राऊळ यांनी ‘छावा’शी बोलताना सांगितले.

निवडून आलो म्हणजे जबाबदारी संपत नाही

निवडणुकीदरम्यान घरोघरी जाऊन उमटे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देणाऱ्या डॉ. सचिन राऊळ यांनी निवडून आल्यानंतरही तोच मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. जिल्हा परिषद सभा, दिशा समिती बैठक आणि प्रशासन स्तरावरील चर्चांमध्ये त्यांनी या प्रश्नावर ठामपणे आवाज उठवत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

“महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हांडा उतरवण्यासाठी आणि नागरिकांना नियमित पाणी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जोपर्यंत या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील,” अशी ग्वाही त्यांनी ‘छावा’ला माहिती देताना दिली.

आज चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी आणि परिसरातील नागरिकांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे 

यावेळी केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष काम होईल.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *