चौल बीबी येथे मृत्यूचा खड्डा निष्काळजीपणामुळे अपघात ठेकेदारांवर गुन्हा दाखल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा ,शनिवार ४ एप्रिल २०२६
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल बीबी गावाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान खोदलेल्या मोरीच्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास, सागवाडी येथील रामनाथ जगन्नाथ फसाळा (वय ३०) हे त्यांच्या मोटारसायकलवरून वावे–चौल मार्गाने प्रवास करत असताना चौल बीबी हद्दीत आले असता मोरीसाठी खोदलेल्या अंदाजे ८ ते १० फूट खोल खड्ड्यात वाहनासह पडले.
✍ सचिन मयेकर
या अपघातात त्यांना हनुवटी, ओठ, कपाळ, नाक व तोंडावर दुखापती झाल्या. विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना, बॅरिकेट्स किंवा इशारे न लावता खड्डा उघडा ठेवण्यात आल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी जयश्री जगन्नाथ फसाळा यांच्या तक्रारीवरून आर. के. मदानी अँड कंपनी व एस. महेश्वरी अँड कंपनी, मुंबई येथील संबंधित ठेकेदारांविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ (अ) व (ब) अंतर्गत गुन्हा क्रमांक ४१/२०२६ नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची संथ गती आणि अपुरी व्यवस्था याचा फटका पोलिसांनाही बसत आहे. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याची कसरत करत आहेत. उन्हात आणि धुळीत सतत ड्युटीमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
स्थानिकांच्या मते, काम योग्य नियोजनाने आणि सुरक्षिततेसह पूर्ण झाले असते, तर ही परिस्थिती टाळता आली असती. सध्या मात्र काम सुरू असून त्याचा भार आणि परिणाम पोलिसांवर आणि नागरिकांवरच पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, रस्त्यावरील खड्डे, अर्धवट कामे आणि सुरक्षेच्या अभावाबाबत *“छावा”*च्या माध्यमातून यापूर्वीही सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. आता या घटनेनंतर प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याने निष्काळजी कामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
![]()

