कुंडलिका खाडीत शिडवाल्या होड्यांची जंगी शर्यत – समुद्रावर थरार, किनाऱ्यावर जल्लोष

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २२ मार्च २०२६

गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिका समुद्र खाडीत पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला आणि संपूर्ण खाडी जणू उत्सवाने दुमदुमून गेली. एकविरा मातेच्या नारळाच्या ओटी भरण्याच्या निमित्ताने आयोजित या शर्यतीत स्थानिक कोळी बांधवांचा उत्साह, समुद्रावरील कौशल्य आणि परंपरेचा अभिमान एकाच वेळी पाहायला मिळाला.

आग्राव जेटी येथून दुपारी बारा वाजता शर्यतीची सुरुवात झाली. एकूण आठ शिडवाल्या होड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात आग्राव येथील गुरुदास कामत यांच्या हिरावती होडीने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला. तर आग्रावच्याच हरिश्चंद्र शेट्टी यांच्या हिरकणी होडीने द्वितीय क्रमांक पटकावला. कोर्लई येथील कमलावती होडी तृतीय तर पद्मावती होडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली.

या स्पर्धेसोबतच कुंडलिका खाडीतील दृश्य अविस्मरणीय ठरले. असंख्य इंजिन होड्यांनी खाडी भरून गेली होती. नातेवाईक, पाहुणे आणि स्थानिक नागरिक कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. समुद्रावर जणू होड्यांचा जत्रोत्सवच साकारला होता.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५५ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३५ हजार रुपये तसेच चतुर्थ क्रमांकासाठी उत्तेजनार्थ बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या शर्यतीत हिरकणी, हिरावती, वसुंधरा, कमलावती, पद्मावती, लक्ष्मी, जयवंती आणि महालक्ष्मी या होड्यांनी सहभाग घेतला होता.

याच निमित्ताने एकविरा आईची पालखी चौल-आग्राव येथून सकाळी कार्ल्याकडे प्रस्थान झाली. आग्राव गावाला ओटी भरण्याचा प्रथम मान असल्याने या परंपरेला विशेष महत्त्व आहे. या होड्यांच्या शर्यतीसाठीही प्रचंड उत्साह दिसून आला. कोर्लई ते पुलाजवळील कुंडलिका नदी परिसरात आणि समुद्र किनाऱ्यावर कोळी बांधवांनी होड्या सजवून महिला-पुरुषांनी पारंपरिक वेशात नाचत-गाजत हा उत्सव साजरा केला.

समुद्र, परंपरा आणि जल्लोष यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या शर्यतीने पुन्हा एकदा कोकणातील सांस्कृतिक वैभव अधोरेखित केले. 🚩

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *