अलिबागमध्ये शेकापचा बालेकिल्ला ढासळला; आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ऐतिहासिक निकाल
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍अलिबाग प्रतिनिधी
- 📅 सोमवार , 9 फेब्रुवारी
रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक दशकांपासून प्रभाव राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ला त्यांच्या परंपरागत बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, 2026 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेनाने निर्णायक यश मिळवत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या अनेक महत्त्वाच्या जागांवर विजय संपादन केला. 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालांनी अलिबाग तालुक्यातील राजकीय स्थितीत लक्षणीय बदल घडवून आणला आहे.
नियोजनबद्ध रणनीतीला यश
या निवडणुकीसाठी आमदार महेंद्र दळवी यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती आखल्याचे दिसून येते. तळागाळातील मतदारांपर्यंत थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवर भर आणि संघटनात्मक बांधणी याचा फायदा शिवसेनेला झाल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, थळ विभागातून शिवसेनेच्या मानसी महेंद्र दळवी यांनी 14,328 मते मिळवत शेकापच्या उमेदवाराचा 6 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या निकालामुळे तालुक्यातील शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
जिल्हा परिषद – ठळक निकाल
आंबेपूर विभाग: शिवसेनेच्या रसिका राजा केणी – 11,974 मते
(भाजप – चित्रा आस्वाद पाटील 7,459 | शेकाप – पूजा अजित भगत 4,785)
आवास विभाग: दिलीप विठ्ठल भोईर (छोटमशेठ) – 11,933 मते
(काँग्रेस – राजेंद्र ठाकूर यांचा 2,372 मतांनी पराभव)
थळ विभाग: मानसी महेंद्र दळवी – 14,328 मते
(शेकाप – सानिका सुरेश घरत 7,859)
चेंढरे विभाग: अदिती नाईक दळवी – 11,313 मते
(शेकाप – प्रवीणा प्रमोद घासे 6,258)
कावीर विभाग: अनंत नारायण गोंधळी – 9,699 मते
(शेकाप – मोहन दत्तात्रेय धुमाळ 9,545)
पंचायत समितीमध्येही शिवसेनेची सरशी
जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीच्या गणांमध्येही शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे.
रुईशेत भोमोली गण: कृष्णा जानू लोभी – 7,052 मते
(शेकाप – रुपेश उघडा 2,735)
आंबेपूर गण: शैलेंद्र राम पाटील – 4,729 मते
(शेकाप – धनंजय म्हात्रे 3,721)
शहापूर गण: भाग्यता नंदन पाटील – 3,820 मते
वैजाळी गण: प्रकाश चंद्रसेन पाटील – 3,376 मते
(राष्ट्रवादी काँग्रेस – मच्छिंद्र पाटील 3,351)
अवघ्या 25 मतांनी विजय
बालेकिल्ल्याच्या प्रतिमेला तडा
आजवर शेकापचा मजबूत प्रभाव असलेला अलिबाग तालुका या निकालांनंतर वेगळ्या राजकीय वास्तवासमोर उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी शेकापचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर राहिले. मतदारांनी दिलेल्या या कौलामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
![]()

