जंगल कमी, अन्नाचा शोध वाढला; रेवदंड्यात वानरांचा धुमाकूळ

छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा | सचिन मयेकर

रेवदंडा परिसरात वानरांचा धुमाकूळ वाढला असून, भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा फटका बसत आहे. नुकतेच वानरांनी केळीचे घड पळवून नेऊन फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास वानरांच्या टोळ्या गावाच्या दिशेने येताना दिसतात. जंगल परिसरात नैसर्गिक अन्नाची उपलब्धता कमी होत असल्याने अन्नाच्या शोधात वानर मानवी वस्तीत शिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावात आल्यानंतर मिळेल ते फळ, भाजीपाला किंवा खाद्यपदार्थ ते खात असल्याने नागरिक आणि विक्रेत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जंगलतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे वानरांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालल्याने हा प्रश्न निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. जंगलात अन्न आणि पाण्याची उपलब्धता कमी झाली तर वन्यजीव मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण आणखी वाढू शकते. वानरांचा हा उपद्रव केवळ नागरिकांसाठी त्रासदायक नसून, माणूस आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाचेही संकेत आहेत. त्यामुळे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *