छावा विशेष | माणुसकीचा अनोखा प्रत्यय! मांजरांसाठी मासे आणायला गेले अन् समुद्रकिनारी दिसला संकटातील मोठा पक्षी! अनिल राऊत यांची धडपड, सर्पमित्र राकेश काठे यांची तत्परता; मुक्या जीवाला मिळाला जीवनदानाचा आधार
माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय बाजारपाडा समुद्रकिनारी घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेतून आला आहे. नेहमीप्रमाणे मांजरांसाठी मासे घेण्यासाठी बाजारपाडा समुद्रकिनारी गेलेल्या अनिल राऊत यांना होड्यांच्या बाजूला एक मोठा समुद्री पक्षी बसलेल्या व थकलेल्या अवस्थेत दिसला. मात्र, हा पक्षी धापा टाकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.१० नोव्हेंबर २६ सचिन मयेकर
पक्षी आजारी असावा किंवा मोठ्या आवाजातील फटाक्यांमुळे घाबरला असावा, असा अंदाज अनिल राऊत यांनी व्यक्त केला. त्यांनी तातडीने त्या पक्ष्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले. मात्र, पक्ष्याची अवस्था पाहून त्यांना स्वस्थ बसवेना. हा मुका जीव वाचला पाहिजे, या एकाच विचाराने त्यांनी मदतीच्या आशेने परिसरात शोधाशोध सुरू केली. दहा मिनिटांच्या अंतरावर सर्पमित्राची भेट; अनिल राऊत यांची धावपळ फळाला आली.
योगायोगाने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर त्यांना सर्पमित्र राकेश काठे दिसले. अनिल राऊत यांनी त्यांना हाक मारून पक्ष्याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच राकेश काठे यांनी आपल्या हातातील काम बाजूला ठेवले आणि तातडीने अनिल राऊत यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली.
समुद्रकिनारी अशक्त अवस्थेत असलेल्या त्या पक्ष्याला राकेश काठे यांनी काळजीपूर्वक आपल्या हातात उचलले आणि सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले. त्यावेळी अनिल राऊत यांनी पक्ष्याला आवश्यक औषधोपचार करण्याची तसेच कुत्र्यांपासून त्याचे संरक्षण करण्याची विनंती केली. कारण अशा असहाय्य अवस्थेतील पक्ष्यावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याची भीती होती ही होती एका मुक्या जीवासाठी दोन माणसांची धडपड.
एकीकडे मांजरांसाठी मासे आणायला गेलेले अनिल राऊत, तर दुसरीकडे स्वतःचे काम बाजूला ठेवून धावून आलेले सर्पमित्र राकेश काठे! या दोघांच्या संवेदनशीलतेमुळे संकटात सापडलेल्या पक्ष्याला वेळीच मदतीचा हात मिळाला.
या घटनेतून एकच संदेश मिळतो, की मुक्या जीवांना बोलता येत नसले तरी त्यांच्या वेदना समजून घेणारी माणसे आजही समाजात आहेत. माणुसकी केवळ माणसांसाठीच नसते, तर मुक्या जीवांच्या रक्षणासाठीही असते.
अनिल राऊत आणि सर्पमित्र राकेश काठे यांच्या या संवेदनशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![]()

