सिद्धू धमाका  अलिबाग सिव्हिलमध्ये MRI द्या, बंद CT Scan तातडीने सुरू करा.CT Scan बंद, गोरगरीबांचे हाल सुरू दोन महिन्यांपासून रुग्णांचा आर्थिक छळ?.

गोरगरीब रुग्णांच्या खिशावर अतिरिक्त भार; सिद्धू म्हात्रे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट सवाल आणि तातडीच्या कार्यवाहीची मागणी

छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर मंगळवार , दि. ०६ ऑक्टोबर २०२६

 रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि बंद असलेली CT Scan मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अशी ठोस मागणी मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून गरीब, सर्वसामान्य आणि गरजू रुग्ण उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात. मात्र गंभीर आजार, अपघात, मेंदू, मणका तसेच अन्य महत्त्वाच्या आजारांसाठी आवश्यक असलेली MRI तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालये किंवा निदान केंद्रांकडे धाव घ्यावी लागते. आधीच आजारपणाचा खर्च, औषधांचा खर्च आणि उपचारांचा आर्थिक भार असताना महागड्या तपासण्यांचा अतिरिक्त खर्च गरीब कुटुंबांसाठी मोठी अडचण ठरत आहे.

यातच CT Scan मशीन बंद असल्यास रुग्णांची अडचण आणखी वाढते. तातडीने CT Scan करण्याची गरज असलेल्या रुग्णांना बाहेर जाऊन तपासणी करावी लागत असल्याने त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली किंवा उपलब्ध करून दिलेली वैद्यकीय यंत्रणा नागरिकांच्या सेवेत तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे सिद्धू म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.

“शासनाने वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली ती गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी. रुग्ण आजारी असताना आवश्यक तपासणीसाठी त्याला खासगी केंद्रात जाऊन पैसे भरावे लागणार असतील, तर शासकीय आरोग्यसेवेचा लाभ सर्वसामान्यांना कसा मिळणार?” असा सवाल सिद्धू म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

सिद्धू म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक MRI मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, बंद असलेली CT Scan मशीन तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, MRI आणि CT Scan विभागासाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी व वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच या सुविधांसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशा मागण्या केल्या आहेत.

“गोरगरीब रुग्णांना तपासणीसाठी बाहेर धावण्याची वेळ येऊ नये. त्यांना शासकीय रुग्णालयातच आवश्यक तपासणी परवडणाऱ्या दरात आणि वेळेत मिळाली पाहिजे,” अशी भूमिका सिद्धू म्हात्रे यांनी स्पष्ट केली.

आरोग्यसेवा ही थेट नागरिकांच्या जीवाशी संबंधित बाब असल्याने CT Scan सुविधा गेली दोन महिने बंद आहें तिची तातडीने दुरुस्ती करून सेवा सुरू करणे आणि MRI सारखी अत्यावश्यक सुविधा अलिबाग सिव्हिलमध्ये उपलब्ध करून देणे, याबाबत प्रशासनाने सकारात्मक आणि तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड; आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र शासन यांनाही देण्यात आली आहे.

आता रायगडच्या गोरगरीब रुग्णांच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग काय निर्णय घेतात, बंद CT Scan सेवा नेमकी कधी सुरू होते आणि अलिबाग सिव्हिलमध्ये MRI सुविधा कधी उपलब्ध होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळ नको, बंद पडलेल्या आरोग्य सुविधा तातडीने सुरू करा आणि आवश्यक अत्याधुनिक सुविधा शासकीय रुग्णालयातच उपलब्ध करा—हीच सिद्धू म्हात्रे यांची प्रशासनाकडे ठाम मागणी आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *