सर्व संकटं झेलत… शेवटी बाप्पा सर्वसामान्यांच्या घरी विराजमान महागाईचा भडका, वाढती वीजबिले, खंडित वीजपुरवठा, बँक संप अन् पाऊस; गणरायाच्या आगमनाआधी सर्वसामान्यांची मोठी परवड

वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली, तो गणरायाच्या आगमनाचा पवित्र दिवस अखेर उजाडला. घराघरांत मंगलमय वातावरण आहे, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष घुमतो आहे. मात्र यंदा गणरायाच्या स्वागताच्या आनंदासोबत सर्वसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. महागाई, वाढती वीजबिले, वीजपुरवठ्याचा लपंडाव, ऐन सणासुदीला बँक संप आणि त्यात निसर्गाने घेतलेली परीक्षा, अशा अनेक अडचणींवर मात करत अखेर बाप्पा सर्वसामान्यांच्या घरात विराजमान झाले.

छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, ता..१४ सप्टेंबर २६

महागाईच्या आगीत घरखर्च होरपळला

पेट्रोल, खाद्यतेल, साखर, कांदा, कडधान्ये आणि रोजच्या किराणा सामानाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या घराचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. सण म्हटला की आनंद, खरेदी आणि उत्साह असायला हवा; मात्र वाढत्या महागाईमुळे आवश्यक वस्तूंची खरेदी करतानाही नागरिकांना अनेकदा विचार करावा लागत आहे.

वाढती वीजबिले अन् मीटरच्या वेगाबाबत नागरिकांच्या तक्रारी

महागाईच्या या संकटात वाढत्या वीजबिलांचाही भार सर्वसामान्यांच्या खांद्यावर आहे. रेवदंडा परिसरातील नागरिकांकडून वीज मीटर वेगाने धावत असल्याबाबत तसेच वाढत्या बिलांबाबत तक्रारी व्यक्त होत आहेत. “वीज वापर तेवढाच, मात्र बिल वाढतच जाते,” अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

ऐन सणात बँक संपाचा फटका

या सगळ्यावर कडी म्हणजे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आलेला बँक संप. पैसा ज्या बँकेत जमा करून ठेवला, त्याच पैशाची गरज सणासुदीला असताना तो काढण्यासाठी अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला.

विशेषतः ज्या ग्राहकांनी एटीएमची सुविधा घेतलेली नाही, त्यांची मोठी परवड झाली. रेवदंडा, उसर आणि तालुक्यातील इतर भागांतून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी प्रत्यक्ष आलेल्या ग्राहकांचा प्रवासाचा खर्च झाला, वेळ वाया गेला; मात्र पैसे हातात मिळाले नाहीत. त्यामुळे मनस्ताप आणि निराशा पदरी पडली.

पैसा बँकेत असूनही सणाच्या वेळी हातात मिळत नसेल तर बँकांचा उपयोग तरी काय?” असा संतप्त सवाल ग्राहकांनी ‘छावा’ प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला.

गणरायाच्या आगमनाच्या आधीचे दोन दिवस खरेदीसाठी महत्त्वाचे असताना पैसा हातात नसल्याने “खरेदी करायची तरी कशी?” असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला.

🌧️ पावसानेही घेतली परीक्षा!

या सगळ्या संकटात निसर्गानेही सर्वसामान्यांची परीक्षा घेतली. गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी रेवदंडा परिसरात पावसाने जोर धरल्याने बाजारपेठेत मोठी धावपळ उडाली. गणपतीसाठी लागणारी फळे, भाज्या, पान-फुले आणि पूजासाहित्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिला विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली.

दिवसभर विक्रीची अपेक्षा ठेवून बाजारात आलेल्या महिला विक्रेत्यांना अचानक आलेल्या पावसापासून आपला माल वाचवण्यासाठी कसरत करावी लागली. काहींना माल झाकण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काहींना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला. पावसामुळे ग्राहकांची वर्दळही विस्कळीत झाली आणि विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला.

गणपतीच्या स्वागतासाठी बाजारात आलेल्या भक्तांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. हातात छत्री, खरेदीच्या पिशव्या आणि त्यासोबत पावसापासून खरेदी केलेल्या वस्तूंचे संरक्षण करण्याची धावपळ, असे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळाले. रस्त्यांवर चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना बाजारात फिरतानाही अडचणींचा सामना करावा लागला.

मात्र पाऊस असो, महागाई असो किंवा बँक बंद असो—बाप्पाच्या स्वागताची भक्तांची ओढ मात्र कमी झाली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांनी गणपतीसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण केली.

दुसरीकडे सहकारी बँका आणि पतसंस्थांचा दिलासा

राष्ट्रीयीकृत बँकांच्या बंदचा फटका बसत असतानाच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरू असलेल्या शाखांमुळे त्यांच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. नियमित आर्थिक व्यवहार सुरू असल्याने संबंधित ग्राहकांना पैसे काढणे, जमा करणे आणि आवश्यक व्यवहार करता आले.

त्याचप्रमाणे ज्या पतसंस्था आणि इतर सहकारी वित्तीय संस्था सुरू होत्या, त्यांच्या ग्राहकांनाही व्यवहार करता आल्याने मोठी सोय झाली. एका बाजूला राष्ट्रीयीकृत बँकांच्या ग्राहकांची अडचण झाली असताना दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या सहकारी बँका आणि पतसंस्था ग्राहकांसाठी आधार ठरल्या.

      रेवदंड्यात वीजपुरवठ्याचाही लपंडाव

सणासुदीच्या काळात घराघरांत रोषणाई, सजावट आणि उत्साहाचे वातावरण असताना रेवदंडा परिसरातील खंडित वीजपुरवठ्याची समस्या नागरिकांसाठी आणखी त्रासदायक ठरत आहे. वीज कधी जाईल आणि कधी येईल, याचा भरवसा नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

 तरीही बाप्पा सर्वसामान्यांच्या घरी विराजमान

महागाईचा भडका, वाढती बिले, वीजपुरवठ्याचा लपंडाव, ऐन सणासुदीला बँक संपाचा फटका आणि त्यात निसर्गाचा पाऊस… या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज गणराय सर्वसामान्यांच्या घरात विराजमान झाले आहेत.

कारण संकट कितीही मोठे असले तरी बाप्पावरील श्रद्धा त्याहून मोठी आहे. कुणाच्या घरी मोठी सजावट असेल, कुणाच्या घरी साधी आरास असेल; कुणाच्या हातात पैसा असेल, तर कुणी काटकसरीने सण साजरा करत असेल; पण बाप्पावरील भक्ती मात्र प्रत्येकाच्या मनात सारखीच आहे.

पाऊस आला… महागाईने खिसा जाळला… बँक बंद राहिल्याने पैसा अडकला… वीजेनेही साथ सोडली… तरीही भक्ती थांबली नाही आणि बाप्पाचे आगमनही थांबले नाही!

आज रेवदंड्यातील घराघरांत गणराय विराजमान झाले आहेत. बाहेर निसर्गाची परीक्षा असली, तरी प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेचा आणि आनंदाचा वर्षाव सुरू आहे.

बाप्पा, सर्वसामान्यांच्या या संघर्षाकडे आता तरी पाहा… महागाई कमी होऊ दे, कष्टाच्या पैशाला आधार मिळू दे, घराघरांत सुख-समाधान नांदू दे, वीज सुरळीत राहू दे आणि कोणत्याही संकटासमोर सर्वसामान्य माणूस हतबल होऊ नये, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना.

 गणपती बाप्पा मोरया….

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *