कोपर्डीला १० वर्षे फाशीचा निकाल झाला न्याय अजून जेलमध्ये सडतोय कोपर्डीपासून पेणच्या रियापर्यंत… 10 वर्षात काय बदललं? फक्त बलात्कार वाढले न्याय मात्र अजून जेलमध्ये आहे
छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर
दहा वर्षे पूर्ण झाली. दहा वर्षात एक मुलगी मोठी झाली असती, लग्न झालं असतं, तिच्या पदराला मुलं लागली असती. पण कोपर्डीच्या त्या चिमुकलीला हे सगळं नाकारलं गेलं. तिला फक्त क्रूरतेच्या शेवटच्या टोकापर्यंत नेण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गाव. 15 वर्षांची शाळकरी मुलगी. शाळेतून घरी जात असताना तीन नराधमांनी तिला उचललं. बलात्कार केला. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी निर्घृणपणे मारून टाकलं. ही घटना फक्त बलात्कार नव्हती. ही संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजावर घाव होता. या एका घटनेने संपूर्ण अखंड मराठा समाज रस्त्यावर आणला. एक मराठा लाख मराठा च्या गर्जने महाराष्ट्र दुमदुमला. राज्यात 60 हून अधिक मूक मोर्चे निघाले. लाखो लोक, हातात भगवे झेंडे, तोंडाला पट्टी. एकही घोषणा नाही, एकही दगड नाही. फक्त एकच मागणी “कोपर्डीच्या ताईला न्याय द्या”.त्यातूनच मराठा क्रांती मोर्चा ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सरकार हादरलं. कोर्टानेही वेग घेतला. 29 नोव्हेंबर 2017 अहमदनगर सत्र न्यायालयाने निकाल दिला. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघांनाही फाशीची शिक्षा पण सत्य काय आहे? आज 2026 आहे निकालाला 9 वर्षे झाली. तरीही एकाही आरोपीला फाशी झालेली नाही. का? कारण “कायदेशीर प्रक्रिया”. अपील, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, दयेचा अर्ज… या फेऱ्यात न्याय अडकला आहे. आणि या दरम्यान काय चाललंय? हे आरोपी सरकारी जेलमध्ये आहेत. आपल्या कराच्या पैशावर त्यांना तीन वेळचं जेवण मिळतंय. वकिलांच्या भेटी होताहेत, टीव्ही बघताहेत, अपीलच्या तारखा पुढे ढकलताहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेने तर येरवडा जेलमध्ये आत्महत्या केली. त्याला तर शिक्षाच भोगावी लागली नाही. म्हणजे एका मुलीचा जीव गेला, एका आईचे अश्रू आजही थांबले नाहीत, लाखो लोकांनी रस्त्यावर रक्त आटवलं… आणि गुन्हेगार मात्र “मानवी हक्क” च्या नावाखाली आरामात आहेत? कोपर्डीनंतर काय बदललं? काहीच नाही.. कोपर्डीनंतरही अनेक निरागस कळ्या चुरगळल्या गेल्या. अनेक माता न्यायाच्या प्रतीक्षेत अश्रू ढाळत थकल्या. अनेक कुटुंब कोर्टाच्या पायऱ्या झिजवून हतबल झाले.
कायद्यात कागदावर बदल झाले, पण जमिनीवर काहीच फरक पडला नाही. सरकारला अजूनही जाग आलेली नाही. आम्ही रस्त्यावर उतरलो. आवाज उठवला. मोर्चे काढले. पण या व्यवस्थेला फाशीचा निकाल देऊनही तो अंमलात आणता येत नसेल, तर मग हा सगळा गोंधळ कशासाठी? कोपर्डी ही फक्त एक घटना राहिलेली नाही. ती या देशातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षेवरचा प्रश्न आहे. जोपर्यंत बलात्काऱ्यांना जलद आणि कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणतीही आई निश्चिंतपणे आपल्या मुलीला बाहेर पाठवू शकणार नाही.
महाराष्ट्रात बलात्काराचे आकडे वाढताहेत, न्याय मात्र फरार आहे
कोपर्डीला 10 वर्षे झाली. त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला. “एक मराठा लाख मराठा” ची गर्जना झाली. सरकारने फाशीचे आश्वासन दिले. कोर्टाने निकालही दिला. पण 10 वर्षांनंतर आजही प्रश्न तोच आहे न्याय मिळाला कुठे? आकडे काय सांगतात ते ऐका. NCRB 2024 च्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3,091 बलात्काराचे गुन्हे नोंदले गेले. महिलांवरील एकूण गुन्ह्यात महाराष्ट्राचा नंबर देशात दुसरा आहे -47,954 गुन्हे आणि हे फक्त नोंद झालेले आकडे आहेत. किती प्रकरणं दडपली जातात देव जाणे. 2025 च्या पहिल्या 5 महिन्यातच राज्यात 3,506 बलात्कार झाले. म्हणजे दररोज सरासरी 23 मुलींची अब्रू लुटली जातेय. अल्पवयीन मुलींची परिस्थिती तर आणखी भयंकर आहे. POCSO अंतर्गत 2024 मध्ये महाराष्ट्रात 4,829 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. मुलांवरील गुन्ह्यात तर महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे – 24,171 गुन्हे मुंबईत एकट्या 2024 मध्ये POCSO चे 660 बलात्काराचे गुन्हे नोंदले.
मग शिक्षा किती जणांना झाली?
इथेच सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नागपूर पोलिसांचा 2025 चा आकडा बघा. बलात्काराचे 117 गुन्हे झाले. त्यातून फक्त 11 दोषसिद्धी झाल्या. म्हणजे 9% conviction rate 2022 ला 24% होता तो आता 9% वर आला. बलात्कार छेडछाड मिळून 213 खटल्यात फक्त 25 दोषसिद्धी. म्हणजे 88% आरोपी सुटतात पोलिस स्वतःच म्हणतात की साक्षीदार तडजोड करून पलटी मारतात. त्यामुळे खटले कमकुवत होतात. सरकार म्हणतंय नवीन कायद्याखाली 96% दोषसिद्धी झाली. पण जमिनीवर चित्र वेगळंच आहे. कोपर्डीच्या तिन्ही आरोपींना 2017 ला फाशी सुनावली. पण आज 2026 आहे, अजून एकालाही फाशी झालेली नाही. मुख्य आरोपीने तर तुरुंगातच आत्महत्या केली. बाकीचे दोघे अपीलच्या नावाखाली सरकारी जेवण खाताहेत.
एका बाजूला दररोज 23 बलात्कार होताहेत. दुसऱ्या बाजूला न्याय मिळण्याची शक्यता 10 पैकी 1 पण नाही. कोपर्डीनंतरही बलात्कार थांबले नाहीत. उलट वाढले. MBVV पोलीस आयुक्तालयात 2023 ला 360 गुन्हे होते, 2024 ला 412 झाले आणि 2025 ला 466 झाले. मोर्चे निघाले, भाषणं झाली, कायदे बदलले, पण गुन्हेगारांच्या मनात जरब बसलीच नाही. कारण त्यांना माहिती आहे केलं तरी 10 वर्षे कोर्ट चालेल, साक्षीदार फोडू, तडजोड करू आणि सुटू.. जेव्हा बलात्काऱ्यांना शिक्षा होत नाही, तेव्हा कोणती आई निश्चिंतपणे मुलीला शाळेत पाठवेल? कोपर्डीच्या ताईच्या नावाने निघालेल्या मोर्चांना न्याय हवा होता, सहानुभूती नव्हे. पण आज 10 वर्षांनंतरही ती ताई न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि महाराष्ट्रातील हजारो ताई रोज अत्याचार सहन करताहेत.
![]()

