उद्या शाळा बंद – अतिमुसळधार पावसाचा इशारा रायगडातील सात तालुक्यांतील शाळांना उद्या सुटी

छावा न्यूज –१ जुलै | सचिन मयेकर, रायगड 

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ आणि २ जुलै दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शाळांना सुटी असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. हवामान विभागाचा इशारा आणि तहसीलदारांकडून प्राप्त अहवालांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

 अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. नदी, नाले आणि समुद्रकिनारी जाणे टाळावे. हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *