“राजा शिवाजी” अलिबागमध्ये अजूनही नाही… शिवप्रेमींमध्ये नाराजी

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल  सचिन मयेकर – दि. १८/०५/२६

राज्यभर गाजणारा “राजा शिवाजी” चित्रपट अलिबागमध्ये मात्र अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सलग दुसऱ्या शुक्रवारीही चित्रपट न लागल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरू असल्याने अनेक विद्यार्थी, पालक व कुटुंबीय हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशावेळी अलिबागमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला असता तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिवप्रेमींच्या पदरी सध्या निराशाच पडत असल्याचे बोलले जात आहे.आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण मोकळा श्वास घेतो, त्यांच्याच इतिहासावर आधारित चित्रपटासाठी आपल्या भागात वाट पाहावी लागते, ही दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

राजा शिवाजी” बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

दरम्यान, “राजा शिवाजी” चित्रपट राज्यभर अक्षरशः धुमाकूळ घालत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने विक्रमी कामगिरी सुरू ठेवली आहे. अवघ्या दोन आठवड्यांत चित्रपटाने तब्बल ९० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याची चर्चा असून मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट वेगाने पुढे जात असल्याचे बोलले जात आहे. अनेक शहरांमध्ये हाऊसफुल्ल शो, थिएटरबाहेरील गर्दी आणि शिवप्रेमींचा उत्साह पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज च्या संघर्षमय जीवनावर, स्वराज्य स्थापनेच्या जाज्वल्य इतिहासावर आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी गाथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. भव्य युद्धदृश्ये, किल्ल्यांचे दिमाखदार चित्रण, प्रभावी संवाद, अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि शिवरायांच्या स्वाभिमानाची जिवंत अनुभूती यामुळे प्रेक्षक भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अलिबागमध्ये “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित होणार का, याकडे आता सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे

हा फक्त सिनेमा नाही आपल्या महाराजांचा जिवंत इतिहास आहे.

शिवरायांचा प्रताप, गनिमी कावा, अफजलखानाचा वध, स्वराज्यासाठी दिलेला संघर्ष आणि इतिहासातील अनेक थरारक प्रसंग नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा “राजा शिवाजी” हा केवळ एक चित्रपट नाही, तर इतिहासाची जिवंत अनुभूती आहे. या चित्रपटात कोणता अभिनेता आहे हा विषय नाही, तर निमित्त आहे आपल्या पाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास समजण्याचं. आजच्या पिढीने स्वराज्य, पराक्रम, त्याग आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जाणून घ्यावी, यासाठी असे चित्रपट प्रत्येकाने पाहिले पाहिजेत, अशी भावना शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे. कारण हा विषय केवळ सिनेमाचा नाही… हा विषय आहे आपल्या महाराजांचा…

 

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *