महाराष्ट्रात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर सरकारसाठी ही लाजिरवाणी घटना धक्कादायक मंदिर प्रवेशाच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण; केस कापले, अर्धनग्न करून चप्पलांचा हार घालून धिंड

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल – दिनांक १७ मे २०२६- रविवार

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. विठ्ठलवाडी परिसरात मंदिर प्रवेशाच्या वादातून एका महिलेसोबत अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना समोर आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी हे वाघरी समाजातील असून फुगे विक्रीचा व्यवसाय करतात. समाजातील देवतांबद्दल महिलेनं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर तिला मंदिरात प्रवेश करण्यास विरोध करण्यात आला. मात्र हा वाद पुढे इतका विकोपाला गेला की महिलेला रस्त्यात पकडून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी महिलेचे केस कापले, तिला अर्धनग्न केले आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून परिसरात फिरवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून CCTV फुटेज तपासले जात असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. याआधीही दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले होते. मात्र कोणत्याही कारणासाठी महिलेला अशी अमानुष वागणूक देणे अस्वीकार्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आज भारतासारख्या प्रगत देशात आणि पुरोगामी महाराष्ट्रात जर महिलांवर अशी क्रूर वागणूक होत असेल, तर ही शासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. महिला सुरक्षा, सन्मान आणि न्याय याबाबत मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांनी आता कठोर कृती करून दाखवण्याची वेळ आली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *