ज्यांच्या लेखणीसमोर कॉम्प्युटरची प्रिंटही फिकी पडेल पत्रकार स्व. मधुकर गंगाराम मयेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
छावा डिजिटल मीडिया– सचिन मयेकर – दिनांक १६ मे २०२६- शनिवार
आज १६ मे… आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक आणि आठवणींनी भरलेला दिवस… कारण आजच्याच दिवशी, १६ मे २००१ रोजी आम्ही आमचे वडील, ज्येष्ठ पत्रकार स्व. मधुकर गंगाराम मयेकर यांना कायमचं गमावलं. पण काही माणसं शरीराने दूर जातात, तरी त्यांची ओळख, त्यांचे संस्कार, त्यांची लेखणी आणि त्यांनी निर्माण केलेली छाप कधीच मिटत नाही… आणि माझ्या बाबांचं व्यक्तिमत्त्व असंच होतं.

रेवदंडा येथील पहिले पत्रकार म्हणून त्यांची संपूर्ण परिसरात वेगळी ओळख होती. त्या काळात पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या छापणं नव्हतं, तर समाजाचा आवाज बनणं, लोकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणं आणि सत्यासाठी उभं राहणं होतं… आणि हे काम त्यांनी आयुष्यभर निष्ठेने केलं. १९९२ च्या आधीच त्यांनी दैनिक सागर, मुंबई सकाळ, दैनिक कृषिवल आणि शिवतेज यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये काम करून पत्रकारितेत स्वतःची एक वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली होती.

त्यांचं अक्षर म्हणजे जणू एक जिवंत कला होती… वळणदार, टापटीप आणि बारीक मोत्यांसारखं अक्षर पाहिलं की नजरा थबकून जायच्या… जणू प्रत्येक शब्द कागदावर नाही तर थेट मनावर कोरला जात होता. त्या काळात कॉम्प्युटर नव्हते, डिजिटल फॉन्ट नव्हते… पण त्यांच्या हस्ताक्षरासमोर आजची कॉम्प्युटर प्रिंटही फिकी पडेल इतकी ताकद, सौंदर्य आणि जिवंतपणा त्यांच्या लेखणीत होता. तो एक वेगळाच “फॉन्ट” होता… जो ना जगात कुठे होता, ना पुन्हा कुणाला जमेल… कारण तो फक्त त्यांच्या हातात आणि त्यांच्या अफाट स्मरणशक्तीत जिवंत होता.
त्यांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त होती की अनेक बातम्या, घटना, नावे आणि तपशील ते सहज लक्षात ठेवायचे… बातमी मांडण्याची शैली वेगळी होती, शब्दांमध्ये वजन होतं आणि समाजासाठीची तळमळ खरी होती. त्यांनी पत्रकारितेला कधी व्यवसाय मानलं नाही, तर ती समाजसेवा म्हणून जगली.
१९९४ सालापासून पत्रकारितेची प्रेरणा, जिद्द, धाडस आणि प्रामाणिकपणाचा वारसा मला माझे वडील स्व. मधुकर मयेकर आणि माझी आई मनीषा मयेकर यांच्याकडून मिळाला. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझी पत्रकारितेची सुरुवात दैनिक कृषिवल मधून झाली आणि आज “छावा”च्या माध्यमातून जे काही उभं आहे, त्या प्रत्येक शब्दामागे त्यांचे संस्कार, त्यांची मेहनत, त्यांचा आशीर्वाद आणि आई-वडिलांनी दिलेली माणुसकी उभी आहे.
आज त्यांच्या स्मृतिदिनी त्या जादुई अक्षरांच्या, त्या निर्भीड लेखणीच्या, त्या मोठ्या मनाच्या आणि पत्रकारितेला आयुष्य समर्पित केलेल्या माणसाला भावपूर्ण विनम्र अभिवादन…
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
आजही मला वडील स्व. मधुकर गंगाराम मयेकर यांचे संस्कार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद सतत प्रेरणा देतात… तसेच माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात आई मनीषा मयेकर, माझी ताई डॉ. स्वाती मयेकर आणि पत्नी हेमलता मयेकर यांचा मोलाचा पाठिंबा, विश्वास आणि कायमचं प्रोत्साहन हीच माझी मोठी ताकद आहे.
![]()

