पर्यटकांसाठी मोठा धक्का २६ मेपासून मुंबई-अलिबाग फेरीसेवा बंद; पावसाळ्यामुळे निर्णय
छावा डिजिटल मीडिया – अलिबाग – सचिन मयेकर – दिनांक १५ मे २०२६
मुंबई ते अलिबाग दरम्यान समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गावरील प्रवासी फेरी सेवा येत्या २६ मे २०२६ पासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत बंद राहणार असून २५ मे हा फेरीसेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.
गेटवे-मांडवा मार्गावर धावणाऱ्या पीएनपी, मालदार, अजंठा आणि इतर खासगी फेरी बोटी या कालावधीत सेवा बंद ठेवणार आहेत. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच दिघी-आगरदांडा मार्गावरील जलवाहतूकही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबईकरांसाठी अलिबाग, नागाव, काशिद आणि मुरुड ही पर्यटनस्थळे कायम आकर्षणाचे केंद्र राहिली आहेत. विशेषतः विकेंड आणि सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटक फेरीमार्गे रायगडकडे रवाना होत असतात. त्यामुळे फेरी सेवा बंद राहिल्याने पर्यटकांना आता रस्तेमार्गाचा पर्याय निवडावा लागणार आहे.
फेरी बंदीचा परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, दुकाने तसेच पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर या सेवांवर अवलंबून आहेत.
दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर हवामानाचा आढावा घेऊन फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बंदर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
![]()

