अलिबाग बस स्थानकात मद्यधुंद व्यक्तीचा गोंधळ प्रवाशांना मोठा त्रास

छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०७ मे २०२६

अलिबाग बस स्थानक परिसरात एका मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने आपले सामान व पादत्राणे स्थानकाच्या मध्यभागी अस्ताव्यस्त टाकून थेट प्लॅटफॉर्मवर झोप घेतल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेवेळी स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी उपस्थित होते. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागला. काही प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणताही प्रतिसाद देत नव्हता.

“सदर व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत होती. दुपारचे बारा वाजले तरी तो उठला नाही. स्थानकातील सुरक्षा रक्षकांकडूनही तत्काळ कारवाई होताना दिसली नाही. मी माझ्या नातेवाईकांना सोडण्यासाठी अलिबाग स्थानकात आलो होतो आणि जवळपास दीड तास तेथे होतो,” अशी प्रतिक्रिया प्रवासी महेश म्हात्रे यांनी दिली.

याबाबत अलिबाग आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांची सुट्टी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, स्थानकातील सुरक्षा रक्षक वैभव पाटील व त्यांचे सहकारी आकाश पाटील यांनी संबंधित व्यक्तीला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने अखेर त्याच्यावर पाणी ओतून त्याला उठवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानक प्रशासनाने अशा प्रकारांवर तातडीने नियंत्रण ठेवून प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *