रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ४०० लिटर गावठी दारू जप्त; ३.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वावे नाका ते वळवळी गावादरम्यान अलिबाग-रोहा रस्त्यावर कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल
रेवदंडा पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, गावठी हातभट्टीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कारवर रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई केली. दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मौजे वावे नाका ते वळवळी गावादरम्यान अलिबाग-रोहा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ३ लाख ४२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
छावा डिजिटल न्यूज मीडिया रविवार , १८ ऑक्टोबर २०२६ सचिन मयेकर
पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी पुरवठा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कारवाई करत दारूचा साठा आणि कार जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ३ लाख रुपये किमतीची कार आणि गावठी हातभट्टीची दारू भरलेल्या रबरी ट्यूबचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ३ लाख ४२ हजार २०० रुपये आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारूची वाहतूक आणि विक्रीसाठी होणारा पुरवठा रोखण्यासाठी रेवदंडा पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुजीत गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे रेवदंडा पोलिसांचा सापळा; ४०० लिटर गावठी दारू जप्त
रेवदंडा पोलिसांना गावठी हातभट्टीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी तातडीने आपल्या पथकाला सूचना देत संबंधित मार्गावर सापळा रचण्याचे नियोजन केले. त्यानुसार पोलीस हवालदार सुधीर पाटील, पोलीस हवालदार महेश पाटील, महिला पोलीस हवालदार शीला ठाकूर, पोलीस हवालदार राजेंद्र गाणार, पोलीस नाईक प्रणित पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मगर यांनी नियोजनबद्धरीत्या कारवाई केली. वावे नाका ते वळवळी गावादरम्यान अलिबाग-रोहा मार्गावर लावलेल्या सापळ्यात गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणारी कार पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ४०० लिटर गावठी दारूचा साठा आणि कार असा एकूण ३ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या नियोजनबद्ध कारवाईचे कौतुक होत आहे.
![]()

