CCTV क्लूमुळे आरोपी जाळ्यात घटनास्थळ सील, SIT सक्रिय २० वर्षांपूर्वीच गावाने टाकला होता वाळीत
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल – PTI – ०४ मे २०२६
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. घटनेनंतर नसरापूरसह भोर-राजगड परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत “तात्काळ आणि कठोर न्याय”ची एकमुखी मागणी केली आहे. पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन, टायर जाळून निषेध — अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला “वासरू दाखवतो” असा बहाणा करून गोठ्यात नेले. त्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुख्य CCTV कॅमेरे बंद होते. मात्र, जवळच्या एका घरातील CCTV फुटेजमध्ये मुलगी आरोपीसोबत दिसल्याने पोलिसांना महत्त्वाचा क्लू मिळाला आणि आरोपीला अटक करण्यात यश आले. अन्यथा केवळ लाईट नसल्यामुळे एवढा मोठा गुन्हेगार सुटण्याची शक्यता नाकारता आली नसती — यामुळे विज व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वतःच गावकऱ्यांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक केले. तसेच मृतदेह गोठ्यात गवताखाली लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे गावकऱ्यांचा संताप अधिकच भडकला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ ‘सील’ करून पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सहा अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तसेच इतर तांत्रिक तपास प्रक्रियाही सुरू आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली असून, लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेत “जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्याने आमच्या घरी येऊ नये,” अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या विकृत वर्तनामुळे तब्बल २० वर्षांपूर्वीच त्याला गावातून वाळीत टाकण्यात आले होते. त्याच्याशी कोणीही संबंध ठेवत नव्हते. याआधीही त्याच्यावर गंभीर आरोप झाल्याची चर्चा असून, आता हा भूतकाळ पुन्हा समोर आल्याने संताप अधिक वाढला आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल आणि खटला फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही “दररोज सुनावणी घेऊन जलद निकाल द्या” अशी मागणी होत आहे.
या अमानुष घटनेने संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा केला आहे. CCTV क्लू, फॉरेन्सिक पुरावे आणि जनतेचा प्रचंड दबाव या सर्वांमुळे आता एकच अपेक्षा आहे: न्याय जलद आणि कठोर!
छावा मत:
आज छत्रपतींचं शासन असतं, तर न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली नसती… अन्याय करणाऱ्याला तात्काळ आणि कठोर शिक्षा झाली असती, आणि समाजात न्यायाचा दरारा निर्माण झाला असता. आता तरी कायद्याच्या चौकटीत राहून कठोर आणि जलद निर्णय घेण्याची हीच खरी वेळ आहे!
![]()

