रेवदंड्यात ‘माय-दे-देऊस’ रस्त्याच्या विकासाला गती.. काँक्रिटीकरणाचा शुभारंभ पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून रस्ता होणार चकाचक भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा
रेवदंड्यातील ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माय-दे-देऊस’ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे…
गुरुवार १५ ऑक्टोबर २०२६ छावा डिजिटल न्युज मीडिया – सचिन मयेकर
अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, या कामामुळे स्थानिकांच्या महत्त्वाच्या मागणीला मूर्त स्वरूप मिळाले आहे.
रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील गोळा स्टॉपसमोरील ‘माय-दे-देऊस’ गल्लीतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. या रस्त्यावरून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन अलिबाग पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाली.
भूमिपूजन सोहळ्यापूर्वी ‘माय-दे-देऊस’ मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे आणि भारती मोरे यांच्या हस्ते मंदिरात पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
त्यानंतर भारती मोरे यांच्या हस्ते पूजा-अर्चा करण्यात आली, तर शरद गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे आणि ग्रामपंचायत सदस्य सुराराम माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर मंदिरात जाणाऱ्या भाविकांची आणि परिसरातील नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे. खराब रस्त्यामुळे होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने या कामाबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुराराम माळी, रेवदंडा शहर शिवसेना प्रमुख योगेश पिटनाईक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते केदार खोत, विजय हाडकर, समीर आठवले, हर्षल घरत, जोएल उंदीर, भारती मोरे, शेणवईकर आदी उपस्थित होते.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारत असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे रेवदंड्यातील एका महत्त्वाच्या धार्मिक स्थळाकडे जाणारा मार्ग अधिक सुकर होणार आहे. आता हे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
![]()

