बोर्ली मांडला परिसरात खळबळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
भोईघर फाटा येथून बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता रेवदंडा पोलिसांकडून तपास सुरू
मंगळवार १३ ऑक्टोबर २०२६ छावा डिजिटल न्युज मीडिया – सचिन मयेकर
मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला येथील भोईघर फाटा परिसरातून १७ वर्षे ७ महिन्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, रेवदंडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी भोईघर फाटा येथील दुकानातून खाऊ घेऊन येते, असे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला; परंतु ती मिळून न आल्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीनुसार, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही अज्ञात व्यक्तीने तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेत, कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुर्वे करीत आहेत.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या शोधासाठी तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासातून स्पष्ट होणार असून, मुलगी लवकरात लवकर सुरक्षित मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

