रणांगण दणाणलं… अखेरचा श्वासही भारतमातेच्या नावाने!  गनमास्टर शहीद निलेश तुणतुणे : कारगिलच्या रणभूमीवर अमर झालेला रायगडचा वीर

छावा’ मराठी डिजिटल न्यूज पोर्टल तर्फे भारतमातेच्या अमर सुपुत्राला विनम्र अभिवादन

सचिन मयेकर |१ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया

आज १ ऑगस्ट… रायगडच्या मातीतला एक दिवस असा, ज्यादिवशी प्रत्येक भारतीयाचे डोळे ओलावतात आणि छाती अभिमानाने फुलते. कारण आज आहे कारगिल युद्धातील रायगडचा शूर सुपुत्र, गनमास्टर शहीद निलेश नारायण तुणतुणे यांचा २८ वा स्मृतिदिन. वर्षे सरतात, काळ बदलतो… मात्र देशासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण कधीच जुने होत नाही. शहीद कधी मरत नसतात… ते प्रत्येक तिरंग्यात, प्रत्येक राष्ट्रगीतामध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या श्वासात जिवंत असतात.

कुलाबा किल्ल्याच्या शौर्यभूमीत जन्मलेला आणखी एक रणसिंह…

अलिबागचा कुलाबा किल्ला… मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा मूक साक्षीदार! ज्या भूमीने शत्रूला समुद्रात धूळ चारणारे योद्धे घडवले, त्याच भूमीने भारतासाठी प्राण अर्पण करणारा आणखी एक सिंह घडवला—गनमास्टर निलेश नारायण तुणतुणे.

६ फेब्रुवारी १९७५ रोजी रायगड जिल्ह्यातील सहानगोठी येथे सौ. निर्मला आणि श्री. नारायण रामभाऊ तुणतुणे यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्या दिवशी कुणालाच कल्पना नव्हती की या घरात जन्मलेला चिमुकला एक दिवस भारतमातेच्या कुशीत अमर होईल.

लहानपणापासूनच निलेश करारी, जिद्दी आणि धाडसी होता. कबड्डीच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना लोळवणारा हा खेळाडू पुढे रणांगणावर शत्रूला धूळ चारेल, याची चाहूल त्याच्या स्वभावातूनच दिसत होती.

जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग ते भारतीय लष्कर…

प्राथमिक शिक्षण सहाणगोठी येथे पूर्ण झाल्यानंतर निलेशने जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे उच्च शिक्षण घेतले. पण त्याच्या मनात एकच स्वप्न होतं—भारतीय सैन्याचा गणवेश.

अलिबाग येथे झालेल्या लष्कर भरतीमध्ये त्याची निवड झाली आणि त्याला हैदराबाद येथे कठोर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान त्याची नेमबाजी, नेतृत्वगुण, शिस्त आणि धाडस पाहून वरिष्ठ अधिकारी प्रभावित झाले. पुढे तो मराठा बटालियनचा गनमास्टर म्हणून ओळखला जाऊ लागला. बंदुकीवरील त्याची पकड आणि लक्ष्यावरची अचूक नजर पाहून सहकारी त्याला अभिमानाने सलाम करत.

देश प्रथम… प्राण नंतर! भारतीय सैनिकासाठी धर्म एकच असतो भारत

निलेशसाठीही देशसेवा हीच पूजा होती. सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा हा हसतमुख जवान रणभूमीवर मात्र वाघासारखा लढत असे. त्याच्यासाठी सीमा म्हणजे केवळ एक रेषा नव्हती… ती भारतमातेची पवित्र लक्ष्मणरेषा होती. आणि… रणांगण दणाणलं!

१ ऑगस्ट १९९८… श्रीनगर-बारामुल्ला परिसरातील सीमारेषेवर निलेश आपल्या तुकडीसह गस्त घालत होता. वातावरण शांत होतं. पण काही क्षणांतच आकाश दणाणून गेलं.

पाकिस्तानी घुसखोरांनी अचानक तोफांचा आणि गोळीबाराचा प्रचंड मारा सुरू केला.

धुराचे लोट… स्फोटांचे आवाज… मृत्यूचं तांडव… पण त्या रणांगणात एक जवान अजूनही ताठ उभा होता…गनमास्टर निलेश तुणतुणे!  त्याच्या बंदुकीतून निघणारी प्रत्येक गोळी भारतमातेच्या संरक्षणासाठी झेपावत होती. प्रत्येक फायरसोबत तो शत्रूला मागे ढकलत होता. गोळ्या शरीराला लागत होत्या… पण त्याचा निर्धार डळमळला नाही. रक्त वाहत होतं… पण हातातील बंदूक खाली पडली नाही. शेवटचा श्वासही त्याने मातृभूमीच्या नावाने घेतला… आणि रायगडचा हा सिंह भारतमातेच्या कुशीत कायमचा विसावला.

अवघं वय… फक्त २३ वर्षं ज्या वयात अनेक तरुण स्वप्नं पाहतात… त्या वयात निलेश तुणतुणे यांनी भारतासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. आईने मुलगा गमावला… वडिलांनी आधार गमावला… सहानगोठीने आपला सुपुत्र गमावला… पण भारतमातेला एक अमर शहीद मिळाला! वीर मरत नाहीत… ते इतिहास बनतात! आज सहाणगोठीमध्ये त्यांची समाधी आहे… पण त्यांचे अस्तित्व केवळ तिथे नाही… ते प्रत्येक तिरंग्यात आहेत… प्रत्येक सैनिकाच्या सलाममध्ये आहेत… प्रत्येक देशभक्ताच्या हृदयात आहेत… आणि रायगडच्या मातीच्या प्रत्येक कणात आहेत.

आज २८ वा स्मृतिदिन…

कारगिल युद्धातील अमर शहीद गनमास्टर निलेश तुणतुणे यांचा २८ वा स्मृतिदिन आज शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता सहानगोठी (ता. अलिबाग) येथे साजरा होत आहे. शहीद निलेश तुणतुणे ट्रस्ट आणि पंचायत समिती, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्मृतिदिन कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश रामचंद्र वाकडीकर, आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वै. माने, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रशासनातील विविध मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अमर वीराला आदरांजली वाहावी, असे आवाहन केले आहे.

शहीदांच्या चितांवर दरवर्षी मेळे भरत राहतील… वतनासाठी मिटणाऱ्यांचे हेच उरलेले निशाण असेल… गनमास्टर शहीद निलेश तुणतुणे हे केवळ रायगडचे नाहीत, तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत. त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाला एकच संदेश देते—देशासाठी जगणं मोठं असतं… पण देशासाठी मरणं अमरत्व देऊन जातं.

🇮🇳 ‘छावा’ मराठी डिजिटल न्यूज पोर्टल तर्फे भारतमातेच्या या अमर वीर सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम…शहीद गनमास्टर निलेश तुणतुणे अमर रहें!

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *