छावा विशेष | १७ जुलै… समुद्र अजूनही त्या किंकाळ्या ऐकत असेल का?

रामदास बोट दुर्घटनेला ७९ वर्षे… इतिहासाच्या पानांवर आजही ओलसर असलेला काळा दिवस

छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर

१७ जुलै १९४७…दिनदर्शिकेतील एक तारीख… पण कोकणातील शेकडो कुटुंबांसाठी हा दिवस कधीच संपला नाही. आज ७९ वर्षे उलटून गेली, तरी १७ जुलै आला की रेवसचा समुद्र, काशाच्या खडकाजवळच्या लाटा आणि त्या लाटांमध्ये विरून गेलेल्या शेकडो जीवांची आठवण मन सुन्न करून जाते. भारत स्वतंत्र होण्यासाठी अवघे काही दिवस उरले होते. देश नव्या युगाच्या स्वागताची तयारी करत होता. पण नियतीने कोकणातील शेकडो घरांवर दुःखाचा असा डोंगर कोसळवला की अनेक कुटुंबांचे भविष्य एका क्षणात बदलून गेले. मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून सकाळी सुटलेली “रामदास” ही प्रवासी बोट रेवसच्या दिशेने निघाली होती. गटारी अमावस्या असल्याने गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती. समुद्र शांत दिसत होता. कोणी आपल्या आईला भेटण्यासाठी निघाले होते… कोणी पत्नी-मुलांकडे… तर कोणी सणासाठी गावाकडे परतत होते. पण समुद्राच्या तळाशी कोणते वादळ दडले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. काशाच्या खडकाजवळ पोहोचताच हवामान अचानक बदलले. प्रचंड वारा सुटला. मुसळधार पाऊस सुरू झाला. उंच लाटांनी बोटीला वेढा घातला. एका प्रचंड लाटेने बोटीला जबरदस्त धक्का दिला. क्षणार्धात बोट कलंडली… आणि समुद्रात आक्रोश उसळला. काही क्षणांपूर्वी हास्याने भरलेली बोट आता मृत्यूच्या दाढेत सापडली होती. कुणी आपल्या मुलाला छातीशी धरून तरंगत होते… कुणी आईचा हात सोडू नये म्हणून झगडत होते… कुणी देवाचा धावा करत होते… तर कुणी शेवटच्या क्षणी आपल्या माणसाकडे पाहत होते. समुद्र मात्र कोणाच्याही आक्रोशाला उत्तर देत नव्हता. या भीषण दुर्घटनेत शेकडो प्रवासी कायमचे समुद्रात विलीन झाले. मृतांचा आकडा विविध ऐतिहासिक नोंदींमध्ये वेगवेगळा आढळतो, मात्र ही भारतातील सर्वांत भीषण सागरी दुर्घटनांपैकी एक मानली जाते. या दुर्घटनेने रेवदंडाही विदीर्ण झाला. आजचे सरपंच प्रफुल्ल यशवंत मोरे यांचे आजोबा, आईचे वडील शिवराम नागवेकर हे देखील त्या बोटीमध्ये होते. ते पुन्हा कधीच घरी परतले नाहीत. एका कुटुंबाची ही वेदना आजही त्या दिवसाची साक्ष देत उभी आहे. मात्र या काळ्याकुट्ट समुद्रात आशेचा एक दिवाही पेटला होता. रेवदंड्याचे हरीभाऊ घारू मढवी हे देखील त्या बोटीतील प्रवासी होते. मृत्यू समोर उभा असताना त्यांच्या हाताला समुद्रात तरंगणारी एक लाकडी फळी लागली. त्या फळीला धरून त्यांनी लाटांशी झुंज दिली. तासन्तास समुद्राशी सामना करत ते उरणजवळील चिरवाडी किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांचे प्राण वाचले. त्या वेळी त्यांच्या पत्नी गरोदर होत्या. काही महिन्यांनी मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी “रामदास” ठेवले. कारण त्या नावात त्यांचा पुनर्जन्म दडलेला होता. ती फक्त नाव ठेवण्याची घटना नव्हती; ती मृत्यूवर मिळवलेल्या विजयाची आठवण होती. दुर्घटनेची बातमी किनाऱ्यावर पोहोचताच रेवस, रेवदंडा, उरण आणि परिसरातील कोळी बांधव आपल्या गलबतांसह समुद्रात धावले. त्या गलबतांमध्ये मासळी भरलेली होती. पण त्या क्षणी त्यांच्यासाठी मासळीपेक्षा माणसाचा जीव मोठा होता. अनेकांनी आपल्या गलबतातील मासळी समुद्रात टाकली आणि ती जागा बुडणाऱ्या प्रवाशांसाठी मोकळी केली. जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांना वाचवले. आजही या बचावकार्याचा उल्लेख रामदास दुर्घटनेच्या इतिहासात आदराने केला जातो. या दुर्घटनेनंतर अनेक मृतदेह दिवसन्‌दिवस किनाऱ्यावर येत राहिले. कित्येक कुटुंबांना आपल्या माणसाचे शेवटचे दर्शनही मिळाले नाही. काही घरे कायमची उद्ध्वस्त झाली. अनेक लेकरांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले. कित्येक मातांच्या कुशीतला आधार समुद्राने हिरावून घेतला. आज ७९ वर्षांनंतरही रामदास बोट दुर्घटना हा केवळ इतिहासाचा विषय नाही. तो कोकणच्या सामूहिक स्मृतीचा भाग आहे. हा इतिहास केवळ पुस्तकांत राहू नये; तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण ज्या समाजाला आपल्या वेदना आठवतात, तोच समाज आपला इतिहास जिवंत ठेवू शकतो. आज १७ जुलै… कदाचित रेवसच्या समुद्रावर पुन्हा लाटा उसळत असतील. पण त्या प्रत्येक लाटेत अजूनही एखाद्या आईची हाक, एखाद्या लेकराचा आक्रोश, एखाद्या पित्याचा शेवटचा श्वास आणि जगण्यासाठी झगडणाऱ्या माणसांचा संघर्ष दडलेला आहे. रामदास बोट बुडाली… पण तिची आठवण आजही कोकणच्या मनातून बुडालेली नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *