सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या पुढाकाराने रेवदंडा बाजारपेठेतील तो जीवघेणा खड्डा बुजवला
छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा | सचिन मयेकर
रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोरील जीवघेण्या खड्ड्याबाबत छावा मध्ये वृत्त प्रसिद्ध करून संभाव्य अपघाताचा धोका अधोरेखित केला होता. या बातमीची तात्काळ दखल घेत रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला. या सामाजिक उपक्रमात गौरी मोरे, हितेश उंदीर, अथर्व झवरे, शुभम शेवडे, प्रसाद गोंधळी, रिद्धेश मोरे आणि रोहित पाटील यांनीही श्रमदान करून मोलाचे योगदान दिले. पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळेत खड्डा बुजविल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्याने ग्रामपंचायतीला आणि स्थानिक ग्रामस्थांनाच पुढाकार घ्यावा लागला. सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केलेल्या या तत्पर कार्याचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, “छावा”ने वेळेवर प्रश्न मांडला आणि सरपंचांनी तत्काळ कृती केली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त करत सर्वांचे आभार मानलें.
![]()

