अलिबाग आरसिएफ कॉलनी ते कुरूळ रस्त्यावर धुरळ्याचे लोळ; पर्यटक लोडनंतर नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 मंगळवार , २७ जानेवारी २६
26 जानेवारीनिमित्त सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांदरम्यान अलिबाग–रेवदंडा परिसरात पर्यटकांचा मोठा ओघ दिसून आला. या कालावधीत अलिबाग आरसिएफ कॉलनी ते कुरूळ या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली होती. सततच्या ट्रॅफिकमुळे अनेक वाहनचालक व प्रवासी ठरलेल्या वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. पर्यटकांचा लोड आणि मर्यादित रस्ता क्षमतेमुळे या मार्गावर मोठा ताण निर्माण झाला.
अलिबाग आरसिएफ कॉलनी ते कुरूळ या मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, कामासाठी संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली आहे. मात्र या मातीवर नियमित पाणी न मारल्याने वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे प्रचंड प्रमाणात धुरळा उडत आहे. दिवसभर धुरळ्याचे लोळ उठत असून काही वेळा समोरचे वाहनही नीट दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना डोळ्यांत जळजळ, नाक-घशात कोरडेपणा आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याच रस्त्यालगत असणारे दुकानदार तसेच आसपासच्या वसाहतींमधील नागरिक यांनाही या धुरळ्याचा गंभीर त्रास होत आहे. धुरळा थेट घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत असल्याने दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
सतत उडणाऱ्या धुरळ्यामुळे परिसरातील लहान बालगोपाळ, वयोवृद्ध नागरिक तसेच सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार, दम्याचा त्रास, सर्दी-खोकला तसेच छातीत जडपणा जाणवण्याच्या तक्रारी वाढत आहेत. सध्या सर्दी-खोकल्याची साथ असताना धुरळ्यामुळे आजार बळावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तीन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांचा मोठा लोंढा आल्याने मोठी वाहने, खासगी कार व दुचाकी यांची सततची वर्दळ सुरू होती. रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्याने संपूर्ण मार्गावर ताण आला आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी नियमित पाणी मारून धुरळा नियंत्रणात आणावा, वाहतुकीचे नियोजन करावे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, दुकानदार आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
![]()

