आईच्या कुशीतून माकडानं तान्हं बाळ पळवलं; विहिरीत फेकलं डायपर ठरला जीवदायी, नर्सच्या सीपीआरमुळे चिमुकलीला नवं आयुष्य छत्तीसगडमधील घटना रेवदंड्यासाठी धोक्याची घंटा; येथेही वानरांचा वाढता धुडगूस
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , २५ जानेवारी २६
छत्तीसगड राज्यातील जांजगीर–चांपा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आईच्या कुशीत असलेल्या अवघ्या २० दिवसांच्या तान्ह्या बाळाला एका माकडाने अचानक हिसकावून नेऊन थेट विहिरीत फेकून दिल्याची ही अंगावर काटा आणणारी घटना आहे. मात्र, ग्रामस्थांची तत्परता, एका नर्सचे धैर्य आणि योगायोगाने बाळाने घातलेला डायपर — या सगळ्यांमुळे चिमुकलीचा जीव वाचला.
ही घटना नैला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिवनी गावात घडली. गावातील अरविंद राठोड यांच्या पत्नी आपल्या नवजात कन्येला कुशीत घेऊन जेवण भरवत होत्या. त्याचवेळी अचानक एक माकड घरात शिरले. काही क्षणातच माकडाने बाळ आईच्या कुशीतून खेचून घेतले आणि पळ काढला. आईने आरडाओरडा करताच कुटुंबीय व ग्रामस्थ धावले. सुमारे १० ते १५ मिनिटे माकड बाळाला घेऊन परिसरात पळत होते.
काही वेळानंतर माकडाच्या हातात बाळ दिसेनासे झाल्याने ग्रामस्थ अधिकच घाबरले. शोध घेत असताना जवळच असलेल्या एका विहिरीत बाळ पाण्यावर तरंगताना दिसून आले. अंदाजे १० मिनिटे बाळ विहिरीत पाण्यात होते. तोंडात पाणी गेल्याने बाळ बेशुद्ध अवस्थेत होते. मात्र, बाळाने घातलेला डायपर पाण्यावर तरंगत राहिल्यामुळे ती पूर्णपणे बुडाली नाही, आणि हाच चमत्कार तिच्या जीवासाठी निर्णायक ठरला.
ग्रामस्थांनी तातडीने बादलीच्या सहाय्याने बाळाला विहिरीतून बाहेर काढले. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या राजेश्वरी राठोड नावाच्या नर्सने क्षणाचाही विलंब न करता बाळाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच बाळाचा श्वास पुन्हा सुरू झाला. उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. प्राथमिक उपचारानंतर बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून कोणतीही गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर गावात माकडांच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, माकडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील ही घटना केवळ एका राज्यापुरती मर्यादित न मानता, रेवदंडा व परिसरासाठी थेट इशारा मानली जात आहे. रेवदंड्यात गेल्या काही महिन्यांपासून वानरांचा उच्छाद वाढत चालला असून, घरांमध्ये घुसखोरी करणे, बाल्कनीतून थेट आत येणे, काचा व आरसे फोडणे, स्लायडिंग काचेच्या दरवाजांवर उड्या मारणे, छपरांचे नुकसान करणे तसेच बागांमधील केळी व चिकूच्या झाडांची नासधूस करणे अशा घटना सातत्याने घडत आहेत.
आजपर्यंत रेवदंड्यातील वानरांचा उपद्रव मुख्यत्वे आर्थिक नुकसानापुरता मर्यादित असला, तरी छत्तीसगडमधील घटनेनंतर हा प्रश्न अधिक गंभीरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास हा उपद्रव भविष्यात जीवितहानीकडे वळू शकतो, असा इशारा नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. छत्तीसगडमध्ये चिमुकल्या बाळाचा जीव वाचला, पण रेवदंड्यात अशीच एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
![]()

