रविवार विशेष —रायगड सांगतो इतिहास : उत्खननात सापडलेलं सोनं, नाणेनिर्मिती आणि स्वराज्याची अर्थसत्ता

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 रविवार , २५ जानेवारी २६

           रविवार विशेष 

रायगड किल्ल्याच्या इतिहासात अनेक गूढ दडलेली आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननात सापडलेला सोन्याचा अलंकार, नाणी आणि इतर अवशेष आजही स्वराज्याच्या आर्थिक सामर्थ्याची, प्रशासकीय शिस्तीची आणि शिवकालीन वैभवाची साक्ष देतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य केवळ तलवारीवर उभं नव्हतं. त्यामागे अत्यंत शिस्तबद्ध, विश्वासार्ह आणि स्वतंत्र अशी आर्थिक व्यवस्था होती. या व्यवस्थेचं केंद्र होतं  रायगड. रायगड म्हणजे केवळ राजधानी नव्हे, तर स्वराज्याची तिजोरी, आर्थिक नियोजनाचं मुख्यालय आणि नाणेनिर्मितीचं केंद्र.

इतिहास साक्ष देतो की रायगडावर टांकसाळ कार्यरत होती. आजच्या भाषेत ‘ट्रेजरिंग मशीन’ म्हणता येईल अशी ही व्यवस्था त्या काळात पूर्णपणे हाताने, पण अत्यंत अचूक नियोजनाने चालवली जात होती. सोनं, चांदी आणि तांबं वितळवून ठरावीक वजनाची व शुद्धतेची नाणी तयार केली जात. साच्यात ठेवून हातोड्याने ठोकून नाणी पाडली जात आणि त्यावर “श्री राजा शिव”, “श्री शिवराज” अशी राजमुद्रा उमटवली जात असे. हे नाणं म्हणजे व्यवहाराचं साधनच नव्हे, तर स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक होतं.

रायगड टांकसाळीत प्रामुख्याने शिवराई (तांब्याची नाणी) मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. ही नाणी दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जात. सैन्याचं वेतन, बाजारपेठेतील खरेदी-विक्री, करभरणा — यासाठी शिवराईचाच वापर होत असे. इतिहासकारांच्या मते थेट आकडे उपलब्ध नसले, तरी दरमहा हजारो शिवराया आणि वर्षाला अंदाजे एक ते दोन लाख नाणी टांकसाळीतून बाहेर पडत असावीत. त्याचबरोबर सोन्याचे ‘होन’ मोठ्या व महत्त्वाच्या व्यवहारांसाठी मर्यादित प्रमाणात तयार केले जात.

ही नाणी केवळ रायगडापुरती मर्यादित नव्हती. रायगड, पाचाड, महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर यांसारख्या बाजारपेठांमध्ये शिवराई सर्रास चालत होती. भाजीपाला, धान्य, मीठ, कापड, लोखंड अशा दैनंदिन वस्तूंचे व्यवहार या नाण्यांवर होत. विशेष म्हणजे, शिवराई रायगडच्या बाहेरही स्वीकारली जात होती. कोकण, देश भाग आणि काही प्रमाणात कर्नाटक सीमेपर्यंत ही नाणी व्यवहारात होती. काही ठिकाणी ती चलन म्हणून, तर काही ठिकाणी तांब्याच्या वजनाने स्वीकारली जात; पण व्यवहार नक्की होत.

रायगड हा केवळ आर्थिक केंद्र नव्हता, तर प्रशासकीय आणि लष्करी नियोजनाचाही मेंदू होता. महसूल संकलन, चौथ-सरदेशमुखीचं नियोजन, सैन्याचा खर्च, किल्ल्यांची दुरुस्ती, युद्धासाठी लागणारा पैसा — हे सगळं रायगडावरून केंद्रीत पद्धतीने नियंत्रित केलं जात होतं. त्यामुळे रायगडावरील खजिना आणि टांकसाळ अत्यंत कडेकोट सुरक्षेत ठेवली जात होती.

या ऐतिहासिक पार्श्वभूमीला अधिक ठोस स्वरूप मिळालं ते उत्खननातून सापडलेल्या पुराव्यांमुळे. काही वर्षांपूर्वी रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या उत्खननादरम्यान किल्ल्यावरील १५ उत्खनन स्थळांपैकी एका ठिकाणी सुमारे २.५ तोळे (३० ग्रॅम) वजनाचा सोन्याचा कडा सापडला. हा शोध समोर येताच इतिहास संशोधकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली.

रायगड विकास प्राधिकरणाचे विशेष अधिकारी मालोजीराव जगदाळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा सोन्याचा अलंकार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे (ASI) तपासणीसाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी हा कडा सापडला, ते ठिकाण कदाचित एखाद्या वरिष्ठ दर्जाच्या सैनिकाचे किंवा महत्त्वाच्या व्यक्तीचे निवासस्थान असावे, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन उत्खनन स्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, पुढील उत्खननातून आणखी महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. रायगडाच्या जमिनीत अजूनही अनेक इतिहासकण दडलेले आहेत.

इतिहास अभ्यासक व किल्लेप्रेमी विष्णू गवळी यांच्या मते, शेकडो वर्षे जमिनीत गाडलेले इतिहासाचे अनेक पैलू पुन्हा उजेडात येत असून भविष्यात ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज किंवा अन्य मौल्यवान पुरावे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, मार्च २०१८ मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी रायगड किल्ल्यावर उत्खननादरम्यान मातीची भांडी, एक नाणे आणि शिसेची गोळी (लेड बुलेट) यांसारखे प्राचीन अवशेषही शोधून काढले होते. हे सर्व पुरावे रायगड केवळ राजकीय राजधानी नव्हे, तर स्वराज्याची आर्थिक, लष्करी आणि प्रशासकीय शक्ती केंद्रित करणारा गड असल्याचं ठामपणे सिद्ध करतात.

या संदर्भातील माहिती यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमध्ये, विशेषतः टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र आजही या शोधांचं ऐतिहासिक महत्त्व तितकंच मोठं आहे.

आजही रायगडाच्या मातीखाली स्वराज्याचा इतिहास जिवंत आहे. उत्खननातून सापडलेले नाणे, अलंकार आणि अवशेष हे केवळ वस्तू नसून स्वराज्याच्या आर्थिक शिस्तीचे, लष्करी ताकदीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे मौन साक्षीदार आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *