स्कूल व्हॅनमध्ये चिमुरडीवर अत्याचार; मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आरोपी दिसताच पीडिता हादरली
बदलापूर, २३ जानेवारी (PTI): छावा डिजिटल न्यूज पोर्टल
बदलापूरमधील एका नामांकित खाजगी शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या व्यवस्थेवर या घटनेने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बदलापूरमधील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत असून ती नेहमीप्रमाणे दररोज शाळेच्या खाजगी व्हॅनने ये-जा करत होती. याच प्रवासादरम्यान व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपासून मुलीच्या वागणुकीत अचानक बदल, भीती आणि अस्वस्थता दिसून येत होती. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला.प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पीडित मुलगी, तिचे पालक आणि पोलीस शाळेत दाखल झाले. आरोपीची ओळख पटवण्यासाठी मुलीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये नेण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या संशयित आरोपीकडे पाहताच चिमुरडी अक्षरशः थरथर कापू लागली. ती रडत आईला घट्ट बिलगली. मुलीच्या या प्रतिक्रियेमुळे उपस्थित पोलीस व पालक हादरून गेले आणि याच क्षणी आरोपीची ओळख स्पष्ट झाली.घटनेची माहिती पसरताच शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली. संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप करत, स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, महिला अटेंडंटची नियुक्ती न करणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात आला.या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.ही घटना केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. शाळा, स्कूल व्हॅन आणि शिक्षणव्यवस्थेतील सुरक्षेचा फेरविचार करण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
![]()

