रविवार विशेष —सिंहगडावर उसळलेला कोप तानाजींचा मृतदेह आणि शेलार मामाची ज्वालामुखी झेप, उदयभानचा मूडदा
रविवार विशेष
हा लेख गोळा करून मांडताना मोठ्या प्रमाणावर माहिती संकलन करावे लागले कारण शेलार मामांचा इतिहास उघडपणे नोंदलेला नसून तो काळाच्या पडद्याआड गेलेला असून बखर परंपरा व लोकस्मृतीतून तो उलगडावा लागला आहे.सिंहगडाच्या मोहिमेत तानाजी मालुसरे यांच्यासोबत अनेक अनुभवी मावळे सहभागी होते. त्यापैकी काहींची नावे इतिहासात नोंदली गेली नसली तरी लोकपरंपरेत शेलार मामा हे नाव अशा ज्येष्ठ मावळ्यांच्या प्रतीक म्हणून पुढे आले आहे.
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , १८ जानेवारी २६
सिंहगडाच्या रणभूमीवर रक्त सांडले होते आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात तानाजी मालुसरे यांचा निश्चल देह पडलेला होता हे दृश्य पाहताच क्षणभर काळ थांबला आणि त्याच क्षणी शेलार मामाच्या छातीत जणू वीज कोसळली कारण तो केवळ सेनानायक पडलेला पाहत नव्हता तर स्वराज्याचा श्वास रक्तात लोळताना पाहत होता डोळे लाल झाले श्वास धगधगू लागला आणि त्या असह्य वेदनेतून आकाश फाडणारी आरोळी निघाली अरे हरामखोरा आणि हातात जिरत घट्ट पकडून शेलार मामा बेफान झेपावला समोर उभा असलेला उदयभान राठोड हा त्या क्षणी केवळ शत्रू नव्हता तर तान्हाजींच्या मृत्यूचा प्रतीक बनला होता आणि एका प्रचंड वारात इतिहासाने कलाटणी घेतली कारण तो वार तलवारीचा नव्हता तर स्वराज्याच्या कोपाचा होता आणि क्षणातच उदयभानाचे शरीर अक्षरशः दोन तुकड्यांत कोसळले रणांगण स्तब्ध झाले आणि तान्हाजींच्या रक्ताला न्याय मिळाला
याच ज्वालामुखीतून शेलार मामाची ओळख इतिहासात कोरली गेली कारण शेलार मामा हे नाव एखाद्या एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून मावळ प्रदेशातील शेलार घराण्यातील एका ज्येष्ठ अनुभवी आणि स्वराज्यनिष्ठ योद्ध्यासाठी वापरले गेलेले नाव होते आणि त्या काळी मामा हा शब्द वयासाठी नव्हे तर आदर अनुभव विश्वास आणि वडीलधाऱ्या योद्ध्याचे स्थान दर्शवण्यासाठी वापरला जात असे कारण स्वराज्य उभे राहत असताना अशा माणसांची गरज होती जे तलवारीपेक्षा निष्ठा उगारत आणि म्हणूनच शेलार मामा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरुवातीच्या स्वराज्य स्थापनेच्या काळातील विश्वासू मावळ्यांपैकी एक मानले जातात कारण ते गनिमी काव्यात पारंगत होते डोंगरदऱ्यांची सखोल माहिती त्यांना पाठ असावी तशी होती गुप्त हालचाली टोही आणि संरक्षण यामध्ये ते निष्णात होते आणि तरुण मावळ्यांना युद्धकौशल्य केवळ शब्दात नव्हे तर स्वतः रणांगणावर उतरून कृतीत शिकवणारे मार्गदर्शक होते लोककथांनुसार अनेक वेळा महाराज संकटात असताना शेलार मामांनी अक्षरशः ढाल बनून त्यांच्या समोर उभे राहण्याचे काम केले आणि म्हणूनच गड चढताना ते पुढे असायचे माघारी येताना शेवटी असायचे संकटात महाराजांसमोर उभे असायचे आणि मृत्यू समोर आला तरी मागे हटणारे नव्हते
इतिहासाच्या पानांवर काही नावे मोठ्या अक्षरात लिहिली गेली पण त्याच इतिहासाच्या मातीखाली असंख्य मावळ्यांच्या प्राणांची आहुती गाडली गेली आणि त्या गाडलेल्या शौर्यातूनच शेलार मामा हे नाव आजही धगधगत राहिले कारण इतिहासाने नेहमी सिंहासनावर बसलेल्यांची नावे लिहिली पण सिंहासन उभे करणाऱ्यांची रक्तरेषा झाकली बखरींमध्ये सेनापती आणि सरदारांची नावे आली पण असंख्य सामान्य मावळे गुमनाम राहिले आणि शेलार मामा हे त्याच गुमनाम शूरवीरांचे प्रतीक बनले त्यांनी विजय मिळवला पण नाव न मागता त्यांना पद नको होते बक्षीस नको होते आणि फक्त एकच शब्द त्यांच्यासाठी पुरेसा होता तो म्हणजे स्वराज्य
आज शेलार मामा हे नाव केवळ इतिहासात नाही तर वर्तमानातही जिवंत आहे कारण आज शेलार मामा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभा राहणारा सामान्य माणूस आहे सत्ता नसतानाही सत्यासाठी लढणारा योद्धा आहे नाव नको पण न्याय हवा म्हणणारा आवाज आहे आणि तो आजही गावात रस्त्यावर लढणाऱ्या माणसात आणि प्रत्येक त्या व्यक्तीत जिवंत आहे जिच्या रक्तात स्वराज्याची ठिणगी आहे त्यामुळे इतिहासाच्या पुस्तकात नाव असो वा नसो स्वराज्याच्या प्रत्येक श्वासात शेलार मामा आजही जिवंत आहे आणि आज गरज आहे त्याच्या नावाला नाही तर त्याच्या विचारांना जिवंत ठेवण्याची
जय भवानी जय शिवराय
![]()

