लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार?’ सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी… रेवदंडा–साळावमध्ये उनाड भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, चावण्याच्या घटनांत वाढ
प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामपंचायतीला तातडीचे पत्र
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 गुरुवार , ८ जानेवारी २६
“लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार? शाळा आणि न्यायालयांच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं आणि माणसं मरत आहेत” अशी संतप्त टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर रेवदंडा, साळाव व परिसरातील वास्तव अधिकच भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे.
अलिबाग–रेवदंडा मार्गावर तसेच रेवदंडा गाव व साळाव परिसरात उनाड भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या काही दिवसांत कित्येक नागरिकांना कुत्र्यांनी चावल्याच्या घटना ताज्या असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला तसेच सकाळी-संध्याकाळी पायी चालणारे नागरिक थेट धोक्यात आले आहेत. काही ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने अपघातांचा धोका देखील वाढला आहे.
आरोग्य यंत्रणेचा इशारा
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राने रेवदंडा ग्रामपंचायतीस लेखी पत्र पाठवून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
कुत्र्यांच्या चावण्याच्या वाढत्या घटनांमुळे Anti-Rabies लसीकरणासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण आणि स्थानिक वास्तव
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की शाळा, रुग्णालये, न्यायालये यांसारख्या संस्थात्मक परिसरांत भटक्या कुत्र्यांची उपस्थिती अस्वीकार्य आहे. रेवदंडा परिसरातही शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रांच्या आसपास कुत्र्यांचा मुक्त संचार दिसून येत असल्याने न्यायालयाच्या निरीक्षणांची थेट पुनरावृत्ती येथे होत असल्याचे चित्र आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की
“कोणता कुत्रा कधी चावेल हे ओळखता येत नाही. सकाळी शांत असलेला कुत्रा संध्याकाळी आक्रमक होऊ शकतो.”
रेवदंडा-साळावमधील घटना या विधानाला दुजोरा देणाऱ्या ठरत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की
➡️ कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण योजना प्रत्यक्षात कधी राबवली जाणार?
➡️ शाळा, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणांजवळील कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार?
➡️ गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?
![]()

