रेवदंड्यासह राज्यभर भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव ठाण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना ५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाप दुःखाने स्मशानात दोन दिवस!

रेवदंड्यात भटकी कुत्री फक्त फिरत नाहीत… जीव घेण्याइतकी मोकाट झाली आहेत.

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 गुरुवार , २५ डिसेंबर २५

भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आता थेट जीवघेण्या स्वरूपात समोर येताना दिसत आहे. रेवदंड्यासह अनेक शहरांत भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर, बाजारात, किनाऱ्यावर आणि वसाहतींमध्ये मोकाट भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे मुलांना, महिलांना, वृद्धांना भीतीचे वातावरण निर्माण होते. काही ठिकाणी लोकांना चावा घेणे, पाठलाग करणे, वाहनांच्या मागे लागणे, रात्री टोळ्या करून फिरणे असे प्रकार सतत वाढत आहेत. रेवदंडा परिसरातही शेकडोंच्या संख्येने भटकी कुत्री मुक्तपणे वावरताना दिसतात. बऱ्याचदा दोन व चारचाकी वाहनांच्या मागे धावताना, वाट रोखताना आणि हल्ला करण्याच्या घटना ही वेळोवेळी घडत आहेत. ही परिस्थिती कोणत्याही क्षणी मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडलेली एक घटना मन सुन्न करणारी आहे. दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर येथील नथुराम शिंदे यांची पाच वर्षांची मुलगी निशा घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर अचानक झडप घेतली व चावा घेतला. कुटुंबीयांनी तातडीने तिला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. रेबीजचे तीन डोस देण्यात आले, मात्र चौथ्या डोसच्या वेळी तिची प्रकृती बिघडू लागली. रेबीजचा प्रभाव वाढत गेला, ती कुत्र्यासारखे आवाज काढू लागली व स्वतःलाच चावे घेऊ लागली. उपचार सुरू असतानाच २१ डिसेंबर रोजी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात या चिमुरडीचा मृत्यू झाला.

निशाचे अंत्यसंस्कार मुंबईत करण्यात आले. विधी आटोपल्यानंतर नातेवाईक घराकडे परतले, पण नथुराम शिंदे परतलेच नाहीत. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर नातेवाईक पुन्हा स्मशानभूमीत गेले आणि ज्या जागी चितारोपण झाले होते, त्याच जागेजवळ नथुराम विमनस्क अवस्थेत बसलेले दिसले. ते थरथरत्या आवाजात पुटपुटत होते – “निशा उठेल, मला हाक मारेल, मला मिठी मारेन… मी तिला घेऊन जाईन.” एका वडिलांचे हे दुःख किती अथांग असू शकते, याची कल्पना करवत नाही. नातेवाईकांनी समजावून त्यांना घरी आणले, पण हा प्रसंग पाहून सर्वांचे मन द्रवले.

या घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आहे. निर्बीजिकरण मोहिमा अपुऱ्या, रेस्क्यू प्रक्रिया मंद, रेबीज प्रतिबंधक लसीकरण मर्यादित – परिणामी अशा दुःखद घटना घडत आहेत. प्रशासकीय पातळीवर भटकी कुत्री पकडणे, निर्बीजिकरण, रेबीजविरोधी लसीकरण मोहीम राबवणे आणि शाळा-मोहल्ल्यांत जनजागृती करणे या उपाययोजना तातडीने व प्रभावीपणे अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीव गमावल्यानंतर जाग येऊ नये. प्रत्येक ‘निशा’ म्हणजे कोणाच्या तरी हृदयाचा तुकडा असतो. आज ही चिमुरडी बातमी झाली आहे, पण उद्या कोण? प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर प्रश्न अधिक विक्राळ होणार हे वास्तव नाकारता येत नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *