रविवार विशेष —छत्रपती शिवाजी महाराज तलवार नव्हे, विचारांचा स्फोट
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
✍️ सचिन मयेकर
📅 रविवार , २१ डिसेंबर २०२५
रविवार विशेष
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, तो एक ज्वालामुखी आहे, जो शतकानुशतके महाराष्ट्राच्या मातीखाली धगधगत राहिला आणि योग्य वेळ येताच स्वराज्याच्या रूपाने स्फोट झाला. परकीय सत्तांनी, सल्तनतींनी आणि अन्यायाने गुदमरलेल्या जनतेला शिवरायांनी केवळ आशा दिली नाही तर स्वतः पुढे उभं राहून सांगितलं हे राज्य आपलं आहे, आणि ते आपणच उभं करणार आहोत. तलवार हातात असली तरी डोक्यात विचार स्पष्ट होते, कारण शिवरायांना जिंकायचं होतं केवळ युद्ध नव्हे तर काळजं, माणसं आणि इतिहास. कमी सैन्य, कमी साधनं, पण अफाट आत्मविश्वास घेऊन त्यांनी गनिमी काव्याच्या जोरावर बलाढ्य सत्तांना हादरवलं आणि दाखवून दिलं की बुद्धी असेल तर ताकद आपोआप झुकते. राजगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग हे दगड-मातीचे ढीग नव्हते तर स्वराज्याची श्वास घेणारी कवचं होती, जिथे प्रत्येक बुरुज सांगत होता की राजा फक्त सिंहासनावर नाही तर प्रत्येक सैनिकाच्या हृदयात आहे. शिवाजी महाराजांचा राजा हा लोकांपासून वेगळा नव्हता, तो शेतकऱ्याच्या बांधावर उभा होता, आईच्या पदराला मान देणारा होता, स्त्रीच्या सन्मानासाठी तलवार उचलणारा होता आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाम उभा राहणारा होता. म्हणूनच त्यांचं राज्य तलवारीच्या जोरावर नव्हे तर न्यायाच्या पायावर उभं राहिलं. शिवरायांनी सांगितलं नाही तर करून दाखवलं की सत्ता म्हणजे दडपशाही नव्हे तर जबाबदारी असते, आणि राजा म्हणजे हुकूमशहा नव्हे तर रयतेचा सेवक असतो. आज शिवाजी महाराज इतिहासाच्या पुस्तकात बंद नाहीत, ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक माणसात जिवंत आहेत, सत्यासाठी लढणाऱ्या पत्रकारात आहेत, प्रामाणिक अधिकारी आणि स्वाभिमानी तरुणात आहेत, कारण शिवराय म्हणजे काळ, जाती, पक्ष यांच्यापलीकडचा विचार आहे. म्हणूनच रविवारचा हा दिवस केवळ सुट्टीचा नसून स्वतःला प्रश्न विचारण्याचा आहे आपल्या आतला शिवराय जिवंत आहे का? कारण डोक्यावर राजमुकुट नसला तरी मनात शिवराय असतील तरच स्वराज्य टिकतं, आणि तोच शिवरायांचा खरा वारसा आहे.
जय जिजाऊ!
जय शिवराय! 🚩
![]()

