धमाका! वळके (ता. मुरुड) गावातील सामाजिक बहिष्कार प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शुक्रवार १२ डिसेंबर २०२५
मौजे वळके (ता. मुरुड, जि. रायगड) येथे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक बहिष्कार प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा क्रमांक 193/2025 प्रमाणे कलम 3, 3(2), 3(3), 3(4), 3(8), 3(10), 3(12), 3(15), 3(16), 5, 6, 7 लागू करण्यात आले आहेत.
फिर्यादी मधुकर नारायण भगत (वय 66, रा. वळके, ता. मुरुड) यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला. त्यानुसार, सन 2016 पासून 8 सप्टेंबर 2025 पर्यंत गावातील समाज मंदिर परिसरात आरोपींकडून त्यांच्या कुटुंबाला गैरकायदेशीर वाळीत टाकण्याचे प्रकार सुरू होते.
शंकर कमळ्या सावंत, गोपीनाथ सहदेव म्हात्रे, सुधाकर धनंजय भगत, राजेंद्र गणपत भगत, कमळाकर तुकाराम पाटील, किसन धर्मा म्हात्रे, शरद महादेव म्हात्रे, अनंता कमळ्या धोत्रे, कमलाकर महादेव म्हात्रे, भारत लखमा सावंत, राजीबाई महादेव भगत, निर्मल जनार्दन भगत, कुसुम गजानन म्हात्रे, सुधीर गंगाजी सावंत, नारायण चांगु वाजंत्री, जनार्दन रामा भगत, लीलाधर लक्ष्मण काटकर, अनिल मधुकर धनावडे, नथुराम सुदाम धनावडे, आत्माराम वामन म्हात्रे, सुभाष हाशा सावंत, अमोल मनोहर भगत, शंकर पद्माकर भगत, जनार्दन नागू म्हात्रे, राजेंद्र धर्मा पाटील, हरिश्चंद्र रामा म्हात्रे, किसन धर्मा म्हात्रे, महादेव नागू भगत, हरिचंद्र झिटू म्हात्रे, अरुण मधुकर धनावडे (सर्व राहणार मौजे वळके, ता. मुरुड, जि. रायगड).
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, गावातील महिला विषयक अन्याय, पंचांचे दंड, वर्गणी व फंड वसुली या गोष्टींवर विरोध केल्यामुळे आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकून सामाजिक बहिष्कार केला. तसेच प्रत्येकी 5000 रुपये दंड व 1000 रुपये व्याज वसूल करण्याचा दबाव आणल्याचा आरोप आहे.
फिर्यादींच्या वडिलांच्या अंत्यविधीत गावकऱ्यांनी सहभागी होऊ नये असा फतवा आरोपींकडून काढण्यात आला होता. तरीही सहभागी झालेल्यांवर चंद्रकांत श्रीराम भगत, राहुल यशवंत काटकर, पदीबाई महादेव काटकर, धनंजय धनावडे यांना प्रत्येकी 5000 रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी चंद्रकांत भगत व राहुल काटकर यांच्याकडून 10,000 रुपये प्रत्यक्ष वसूल केल्याचे फिर्यादीने सांगितले. धनंजय धनावडे यांनी दंड न दिल्याने त्यांनाही बहिष्कार टाकण्यात आला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाणे करत आहे.
![]()

