अमेरिकेत आगीत भारतीय तरुणीचा मृत्यू झोपेतच शेवट मास्टर्सचे स्वप्न राखेत… कुटुंबावर काळाचा घाला
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI – रविवार ०७ डिसेंबर २०२५
अमेरिकेत मास्टर्सचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलेल्या साहजा रेड्डी या भारतीय विद्यार्थिनीचा झोपेतच भीषण आगीत मृत्यू झाला आहे. तेलंगणातील जंगांव येथे राहणारी साहजा न्यूयॉर्क राज्यातील अल्बानी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अल्बानी शहरातील अपार्टमेंट इमारतीला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीचा भडका इतका वाढला की साहजाला बाहेर पडण्याची कुठलीही संधी मिळाली नाही. तिच्या शरीराचा तब्बल 90 टक्के भाग भाजला होता आणि बचावकार्य सुरू होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. तिचे वडील हैदराबादमधील एका कंपनीत कर्मचारी तर आई सरकारी शाळेत शिक्षिका असून कुटुंबातील मोठ्या मुलीच्या यशाची वाट पाहणाऱ्या या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत साहजाचे पार्थिव भारतात आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती मदत सुरू केली आहे. नातेवाईकांनी GoFundMe अभियान सुरू करून अंत्यसंस्कार व प्रक्रिया खर्चासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले असून जंगांव परिसरात शोककळा पसरली आहे. उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विदेशात गेलेल्या या तरुणीचा असा क्रूर शेवट झाल्याने भारतीय समुदायात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि एकच प्रश्न उपस्थित होतो परदेशातील स्वप्नांची किंमत इतकी मोठी का असावी?
![]()

