चौल-भोवाळे दत्त मंदिर श्रद्धा, इतिहास, भक्ती आणि निसर्गाचा संगम
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर गुरुवार 0४ डिसेंबर २०२५
‘दिगंबरा दिगंबरा’ जयघोषात चौल-भोवाळे दत्तयात्रेला शुभारंभ.
आजपासून चौल-भोवाळे येथे दत्तभक्तांचा महापूर, सुरू पाच दिवसीय महान दत्तजयंती यात्रा


अलिबाग तालुक्यातील चौल या प्रसिद्ध गावाशेजारी असलेल्या भोवाळे येथील एका निसर्गरम्य टेकडीवर दत्त दिगंबराचे प्रसिद्ध स्थान आहे. समृद्ध वनराईतून बांधण्यात आलेल्या सुमारे ७५० पायऱ्या चढून या मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिर उंचावर असल्याने येथून खाली असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा, हिरवेगार डोंगर, रेवदंड्याची खाडी आदी मनोहारी दृश्ये नजरेत सामावता येतात. रेवदंडा व चौल या शहरांचे विहंगम दृश्यही येथून टिपता येते. चौल नाका ओलांडून पुढे आल्यावर भोवाळे तलाव लागतो. या तलावाच्या बाजुला दत्तमंदिराकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून तीन मार्ग आहेत. पायरी मार्गाने गेल्यावर होणाऱ्या शारीरिक कष्टानंतर होणारे दत्तगुरूंचे दर्शन अधिक समर्पक ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की अठराव्या शतकात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे मंदिर उभारले गेले आहे. स्वामी ब्रह्मेंद्र यांनी १८१० साली येथे लहानसे मंदिर बांधले होते. काही वर्षांनी तेथे एक दत्तभक्त राहण्यास आला. त्याच्याकडे श्रीदत्तांच्या पादुका होत्या. त्याने १८३१ साली या पादुकांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर तीन वर्षांनी काही दत्तभक्तांनी एकत्र येत कळस आणि प्रदक्षिणेचा मार्ग बांधला. १८४३ ते १८५२ या काळात मंदिरासमोरचा मंडप तसेच बाजुला पुजाऱ्यांना राहण्यासाठी घर उभे राहिले. मंदिर उंच डोंगरात असल्यामुळे चढून येणे त्रासाचे आणि धोकादायक होते. त्यामुळे १८५७ च्या सुमारास नारायण खत्री या दत्तभक्ताने मंदिरात येण्यासाठी ७५० पायऱ्या बांधून घेतल्या. तोपर्यंत मंदिरात केवळ पादुकाच होत्या. पायऱ्या बांधल्या त्याच वर्षी काळ्या पाषाणात कोरलेल्या ‘तीन शिरे, सहा हात’ असलेल्या दत्तगुरूंच्या सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९६३ साली मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आज दिसत असलेले पक्के मंदिर उभे राहिले. मंदिरात येण्यासाठीचा मुख्य मार्ग भोवाळे तलावाच्या बाजूने आहे. या मार्गावर असलेल्या कमानीतून पुढे आल्यावर पायरी मार्ग सुरू होतो. यापैकी पहिल्या पायरीवर उजव्या हाताला दत्ताच्या पादुका आहेत. ज्यांना वर जाऊन दर्शन घेणे शक्य नसेल, ते भक्त या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात.वाटेत विश्रांती घेण्यासाठी व तहान भागवण्यासाठी पाणपोयी बांधलेल्या आहेत. साधारणतः ५०० पायऱ्या चढल्यावर पहिला टप्पा पार होतो. येथे अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांचा मठ आहे. मठात स्वामींची मूर्ती आणि प्रतिमा आहे. येथपर्यंत येण्यासाठी घाटरस्ता असल्याने वाहनानेही येथे येणे शक्य आहे.मठाच्या पुढे भग्नावस्थेतील जुन्या दीपमाळा, समाधी साधना कुटी, बुरांडे महाराजांची समाधी, लहान दत्तमंदिर, हरेराम बाबा मठ, धुनी मंदिर, साईबाबा मंदिर अशी धार्मिक स्थळे येत राहतात. येथूनच मुख्य दत्त मंदिराचा घुमटाकार कळस दिसू लागतो. कामानीतून आत आल्यावर काही पायऱ्या चढल्या की मुख्य दत्तमंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या आटोपशीर सभामंडपात जुन्या काळातील मोठी पितळेची घंटा टांगलेली आहे. गर्भगृहात त्रिमुखी, सहा हात असलेली दत्तगुरूंची काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आणि प्राचीन पादुका आहेत. दत्तमंदिराच्या दक्षिणेकडे माई जानकीबाई व हनुमानदास यांचा मठ आहे. समाधी व राम-लक्ष्मण-सीता, गणपती, शिवलिंग अशी पूजास्थानेही येथे दिसतात. पश्चिमेला दरीकडे पाहिले असता कुंडलिका नदी समुद्राला मिळते ती खाडी, साळाव-रेवदंडा परिसर, कोर्लई किल्ला व भोवाळे तलाव हा भाग दिसतो. पावसाळ्यात या स्थानाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रतिवर्षी येथे दत्तजयंतीनिमित्त पाच दिवसांची जत्रा भरते. यात्रेपूर्वी सात दिवस अखंड सप्ताह असतो. जत्रेच्या पहिल्या दिवशी चांदीचा मुखवटा चौल-थेरोंडा येथून पालखीतून दिमाखात मंदिरात आणला जातो व दत्तमूर्तीला लावला जातो. दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी दत्तयज्ञ केला जातो. वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात आणि येथे मनोकामना पूर्ण होत असल्याचा अनुभव अनेक श्रद्धाळूंकडून सांगितला जातो. म्हणूनच हे दत्ताचे स्थान अत्यंत जागृत मानले जाते.
संपादकीय नोंद निसर्ग, इतिहास, वनराई, समुद्राचा सहवास आणि भक्ती यांचा अद्भुत संगम असलेले हे ठिकाण भाविकांसाठी जीवनातील समाधान, शांती आणि ऊर्जा देणारे स्थान आहे… एकदातरी या पर्वतवासी दत्ताचे दर्शन घ्या.
![]()

