रायगड मार्गावरील खड्ड्यांचा कहर! विद्यार्थ्यांची मिनीबस पलटी; ६ जण जखमी, एक गंभीर

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––महाड प्रतिनिधी —रविवार 30 नोव्हेंबर २०२५

किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था, जागोजागी उघड्या खड्ड्यांचे साम्राज्य आणि अर्धवट सोडलेले काम याचा फटका रविवारी पहाटे सांगली जिल्ह्यातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला. नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत खाजगी मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटी झाली आणि या अपघातात चार विद्यार्थिनींसह शिक्षक व चालक असे सहाजण जखमी झाले. अक्षरा अजय ढोवळे, आदिती रवींद्र खेरमोडे, आदिती दीपक खाडे, सिद्धी दीपक ढोवळे, चालक योगेश वसंतराव जाधव आणि शिक्षक जगन्नाथ विश्वास येवले अशी जखमींची नावे असून सर्वजण सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत.  सर्व विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, बाऊच, तालुका वाळवा या शाळेतील विद्यार्थी आहेत.11 वाजता ही सहल रायगडासाठी निघाली होती. पहाटे सुमारे 5.50 वाजता महाडमार्गे रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक येथे खोल खड्ड्यांमुळे बस घसरून पलटी झाली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले असून आदिती खेरमोडे हिची दुखापत गंभीर असल्याने तिला सिटीस्कॅनसाठी माणगाव येथे हलविण्यात आले. इतरांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला असला तरी स्थानिकांच्या मते खरी जबाबदारी रस्त्याचे काम अर्धवट ठेवणाऱ्या आणि खड्डे बुजविण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागावर आहे. रस्त्यावरील दररोजच्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप उसळला असून “प्रवासी मरतात पण कारवाई मात्र कुणावरच होत नाही” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रायगडकडे जाणाऱ्या ऐतिहासिक पर्यटन मार्गाची वाटच आता शाब्दिक नाही तर अक्षरशः जीवघेणी बनल्याचा सवाल या घटनेतून आणखी एकदा समोर आला आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *