धमाका : जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षांची शिक्षा
छावा डिजिटल न्युज —अलिबाग (प्रतिनिधी):
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये तलवार, लोखंडी शिगा आणि लाकडी दांडक्यांसह घुसून हल्ला करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षे तीन महिने कारावास आणि सात हजार तीनशे रुपयांचा दंड अशी शिक्षा अलिबाग सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. ३०) सुनावली आहे.
११ सप्टेंबर २०१२ रोजी सायंकाळी पावणे सहा ते सव्वा सहा या दरम्यान चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून दिलीप भोईर हे २४ साथीदारांसह इन्स्टिट्यूटमध्ये घुसले होते. आरोपींच्या हातात तलवारी, लोखंडी शिगा व लाकडी दांडके होते.
इन्स्टिट्यूटमधील साहित्याची तोडफोड करून त्यांनी रुपाली थळे यांना मारहाण केली आणि त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भोईर यांनी रुपाली थळे यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, यात त्यांच्या हाताला दुखापत झाली.
थोड्याच वेळात रुपाली थळे यांचे पती विजय थळे आपल्या दोन मित्रांसह घटनास्थळी आले. त्यांनी पत्नीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता भोईर यांनी विजय थळे यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला. त्यानंतर आरोपींनी विजय थळे, त्यांचे मित्र आणि बहिणी मनिषा घरत यांनाही मारहाण केली.
या प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात झाली. विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये जखमी साक्षीदार, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि घटनास्थळ पंच प्रसाद गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
साक्षी व पुराव्यांच्या आधारे मुख्य सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी दिलीप भोईर यांच्यासह इतर २० जणांना दोषी ठरवत सात वर्षे तीन महिने कारावास आणि सात हजार तीनशे रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
दिलीप भोईर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. या काळात त्यांनी झिराड ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषविले. नंतर त्यांनी शेकाप पक्षात प्रवेश करून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतीपद भूषविले.
२०२३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्हा उपाध्यक्षपद मिळवले. परंतु २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोरी केली. त्यामुळे भाजपने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला असून सध्या ते या पक्षाशी संलग्न आहेत.
![]()

