अजूनही शोध सुरूच… सिद्धीचा ठावठिकाणा अद्याप गूढच.
रेवदंडा येथील तरुणी सिद्धी दिलीप काटवीच्या बेपत्ता प्रकरणात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तपास अधिकाऱ्यांनी विविध दिशांनी शोधमोहीम राबवूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. घटनेला सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असून, कुटुंबीयांवर प्रतीक्षेचं ओझं अधिकच वाढलं आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर , सोमवार – २७ ऑक्टोबर २०२५
पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल-डिटेल रेकॉर्ड, तसेच संबंधित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. काही माहिती राजस्थानपर्यंत पोहोचली असल्याचे आधी समोर आले होते, मात्र त्यातून ठोस धागा मिळालेला नाही. तपास अजूनही सुरूच आहे, असे समजते.
सिद्धीच्या बाबतीत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू असून, एवढा काळ उलटूनही काहीच निष्कर्ष लागला नाही, हे धक्कादायक आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनीही अधिकाऱ्यांकडे तपास गतीमान करण्याची मागणी केली होती.
गावात अजूनही आशेचा किरण जिवंत आहे ती कुठेतरी असेल आणि परत येईल, या विश्वासानेच सर्व जण वाट पाहत आहेत.
कोणालाही सिद्धी काटवीबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

