रविवार विशेष— ब्रिटिशांचं नाव राहिलं नाही… पण महाराजांचं नाव अजरामर होतं आहे आणि कायम राहील….

या लेखातील ऐतिहासिक माहिती भारतीय रेल्वे विभागाच्या अधिकृत कागदपत्रांमधून, मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीतून आणि काही विश्वसनीय ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमधून घेतली आहे.

   रविवार विशेष 

व्हिक्टोरिया टर्मिनस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मराठी अभिमानाची कहाणी

मुंबईचं हृदय म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते भव्य स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST). रोज लाखो लोक या स्थानकातून प्रवास करतात. पण फार थोड्यांना माहिती आहे की या इमारतीचा इतिहास किती जुना आणि अभिमानास्पद आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय रविवार – २६ ऑक्टोबर २०२५

एकेकाळी या स्थानकाचं नाव “व्हिक्टोरिया टर्मिनस” असं होतं. हे नाव पडलं होतं इंग्रजांच्या राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून. १८८७ साली इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजवताना ही इमारत बांधली. इंग्रज वास्तुविशारद फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी गॉथिक शैलीत ही भव्य इमारत उभी केली. त्या काळात ही इमारत त्यांच्या ताकदीचं आणि राज्याच्या गर्वाचं प्रतीक होती. भारत स्वतंत्र झाला, पण अनेक ठिकाणी अजूनही इंग्रजांच्या आठवणींची नावं तशीच राहिली. “व्हिक्टोरिया टर्मिनस” हे नावही त्यातलंच एक. पण मराठी माणसाच्या मनात नेहमी एक प्रश्न होता आपल्या स्वराज्य स्थापक राजाचं नाव या भूमीवरच्या मोठ्या स्थानकावर का नसावं? १९९० च्या दशकात या नाव बदलासाठी चळवळ सुरू झाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे सरकारनं १९९६ मध्ये मोठा निर्णय घेतला “व्हिक्टोरिया टर्मिनस”चं नाव बदलून “छत्रपती शिवाजी टर्मिनस” करण्यात आलं. तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाचा ठरला. पण लोकांच्या मनात अजून एक मागणी होती नावात “महाराज” हा शब्द असायला हवा. कारण शिवराय फक्त राजा नव्हते, ते महाराज होते जनतेच्या हृदयात राज्य करणारे शेवटी २०१७ साली रेल्वे मंत्रालयाने त्या मागणीला मान्यता दिली आणि या स्थानकाचं अधिकृत नाव ठरलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आज हे स्थानक फक्त प्रवासाचं केंद्र नाही, तर मराठी अभिमानाचं प्रतीक बनलं आहे. ब्रिटिश राणीचं नाव हटवून आता या ठिकाणी आपल्या राजाचं नाव झळकतं हेच खरं स्वातंत्र्याचं समाधान आहे. ही इमारत आज युनेस्कोच्या World Heritage Site यादीत आहे. दररोज लाखो प्रवासी इथून गाड्या पकडतात, पण त्यांना हे स्थानक फक्त इमारत वाटतं. प्रत्यक्षात ही इमारत इतिहास सांगते इंग्रजांची सत्ता संपली, पण शिवरायांचं नाव आजही कायम तेजाने झळकत आहे. आज जेव्हा एखादा प्रवासी तिकीट काढून “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असं नाव वाचतो, तेव्हा मनात एक भाव उमटतो हा प्रवास कुठेही जाऊ दे, पण त्याची सुरुवात झाली आहे आपल्या महाराजांच्या नावाने..

व्हिक्टोरिया टर्मिनस का बांधलं गेलं?

१८०० च्या दशकात मुंबई ब्रिटिशांसाठी भारताचा सागरी व्यापार केंद्रबिंदू बनली होती. त्यांना मुंबईतून कापूस, मसाले, धान्य, आणि धातूंचा माल इंग्लंडला पाठवायचा होता. त्यासाठी मोठं रेल्वे जाळं तयार करण्यात आलं आणि त्याचं मुख्य ठिकाण असावं म्हणून व्हिक्टोरिया टर्मिनस बांधलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या ही इमारत फक्त मालवाहतुकीसाठी नव्हती. ब्रिटिशांना स्वतःचं राजस सामर्थ्य आणि वैभव दाखवायचं होतं. त्या काळात लंडनमध्ये “सेंट पॅन्क्रस” सारखी भव्य स्टेशनं होती, आणि भारतातही ते तसंच काहीतरी बांधून दाखवू इच्छित होत म्हणजे एकप्रकारे हे बघा, आम्ही भारतात आलो आणि ही सभ्यता, ही रचना आम्ही दिली असा संदेश.. त्यामुळे “व्हिक्टोरिया टर्मिनस” ही केवळ स्टेशन नव्हती ती ब्रिटिश साम्राज्याच्या शक्तीचं प्रतीक होती. मग सागरी अरमाराशी याचा संबंध होता का प्रत्यक्षात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुंबईसारख्या किनाऱ्याचं महत्व सागरी संरक्षण आणि व्यापारासाठी होतं. महाराजांनी वसईपासून सिंधुदुर्गापर्यंत दर्‍यागडांवर सागरी किल्ले बांधले आणि भारताचं पहिलं सुसंघटित नौदल (अरमार) उभारलं. पण इंग्रजांची भूमिका वेगळी होती ते समुद्रावर आधीच प्रभुत्व मिळवून बसले होते. त्यांना सागरी संरक्षणापेक्षा सागरी व्यापाराचं नियंत्रण महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्यांनी मुंबई बंदर विकसित केलं, मालवाहतुकीसाठी रेल्वे बांधली, आणि त्या रेल्वेचं मुख्य केंद्र बनवलं व्हिक्टोरिया टर्मिनस. थोडक्यात सांगायचं तर शिवरायांनी समुद्रावर स्वराज्य स्थापण्यासाठी किल्ले बांधले, आणि इंग्रजांनी समुद्रावरून साम्राज्य टिकवण्यासाठी स्टेशन आणि बंदरं उभी केली.

मोठेपणासाठी बांधलेलं स्मारक

व्हिक्टोरिया टर्मिनस बांधताना ब्रिटिशांचा हेतू होता आपण भारतात किती मोठं, भव्य आणि प्रगत आहोत हे दाखवणं. तेव्हा मुंबईत अशी इमारत बांधणं म्हणजे ब्रिटिशांचा राजकीय आणि सांस्कृतिक दिखावा होता. स्थानिक लोकांच्या गरजा नव्हत्या उलट, त्या काळी मुंबईच्या जनतेसाठी अशा रेल्वे सोयी मर्यादितच होत्या. पण आज काळ बदलला. ज्यांच्यासाठी ही इमारत “साम्राज्याचं चिन्ह” होती, तीच आता स्वराज्याचं आणि मराठी अस्मितेचं प्रतीक बनली आहे.हीच इतिहासाची मजा आणि न्याय.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *