रोड टॅक्स भरतो, PUC काढतो… मग रस्ता कोण देणार? अलिबागच्या–बेलकडे रस्त्यावर धुळीचं वादळ, खड्ड्यांचं साम्राज्य
रस्त्याला वाली कोण आहे?
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शनिवार – ११ ऑक्टोबर २०२५
अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता अक्षरशः रस्ता की रणांगण!
या मार्गावर दररोज प्रचंड धुळीचे लोळ उडत असून, खोल खोल खड्ड्यांमुळे वाहन चालवणं म्हणजे धोक्याचा खेळ बनला आहे. पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ सर्वजण या परिस्थितीमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत.
दिवसाढवळ्या उठणाऱ्या धुळीच्या ढगांमुळे प्रवाशांना दोन फूट पुढे दिसत नाही. वाहनांच्या मागून उडणाऱ्या धुळीमुळे चालकांचा तोल जातो, तर श्वसनाचे आजार, खोकला, दमा आणि मणक्याचे आजार वाढले आहेत. रोज प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिक अक्षरशः जीवाशी खेळ करत हा रस्ता ओलांडत आहेत.
रस्त्यावर इतके खोल खड्डे आहेत की वाहनं उजवीकडे–डावीकडे झोके घेत जातात जणू आट्या-पाट्यांचा खेळच सुरू आहे!
उखडलेला रस्ता आणि उडणारी धूळ यामुळे हा मार्ग लोकांसाठी रोजच्या यातनेचा रस्ता बनला आहे.
पर्यटक आणि ग्रामस्थ यांची तक्रार तीच
“आम्ही रोड टॅक्स भरतो, PUC काढतो, नियम पाळतो,
मग प्रशासन आपली जबाबदारी का पाळत नाही?
रस्त्यांची अशी दुरवस्था करून आमच्यावर अन्याय का केला जातो?”
ग्रामस्थ आणि प्रवाशांचा सवाल थेट आणि जळजळीत आहे कोणी रस्ता देतो का रस्ता?
रस्त्याच्या नावाखाली खड्ड्यांचं साम्राज्य आणि धुळीचं वादळ सुरू असताना प्रशासन गप्प का बसलंय, हा प्रश्न जनतेच्या मनात धगधगत आहे.
![]()

